बीड : सुंदर माझे कार्यालय आणि माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी केले.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘सुंदर माझे कार्यालय’ व ‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनानुसार ३ जून रोजी परळी पंचायत समितीच्या सभागृहात कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यावेळी शिक्षणाधिकारी कुलकर्णी बोलत होते. संगणक प्रोग्रामर सुरेंद्र रणदिवे, कोव्हिड -१९ चे शिक्षण विभाग जिल्हा समन्वयक राहुल चाटे, गटशिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे, निरंतर शिक्षणचे उपशिक्षणाधिकारी पुजारी, शिक्षण विस्तार अधिकारी हिना अन्सारी आदी उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी ‘सुंदर माझे कार्यालय’ व ‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व मुद्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच या अनुषंगाने शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबाबत संवाद साधला. ‘बाला’ डिझाइन आयडिया राबविण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सुरेंद्र रणदिवे यांनी यू-डायस, शाळासिद्धीबाबत सविस्तर माहिती दिली. राहुल चाटे यांनी विभागीय कार्यालयाला माहिती पाठवण्यासाठी तयार केलेल्या प्रपत्रामध्ये माहिती कशाप्रकारे भरावी याबाबत सविस्तर प्रपत्र समजावून सांगितले. गटशिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे यांनी परळी तालुक्यातील सर्व शाळांमध्ये ‘सुंदर माझे कार्यालय’ व ‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली. या कार्यशाळेस सर्व मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक व सर्व विषय साधनव्यक्ती उपस्थित होते.
===Photopath===
030621\535803_2_bed_12_03062021_14.jpeg
===Caption===
परळीत शिक्षकांसाठी कार्यशाळा