बीड/कडा : माझे तिकीट राज्याने नव्हे, तर देशातील सर्वोच्च नेत्याने ठरवले आहे. ही जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी पुन्हा राज्यातील भाजप नेत्यांना आव्हान दिल्याचे दिसत आहे.
लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे शुक्रवारी दुपारी बीड जिल्ह्यात आल्यानंतर जिल्ह्याच्या सीमेवर धामणगाव (ता. आष्टी) येथे स्वागत करण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझ्याबद्दल काहीतरी वाटले असेल म्हणूनच त्यांनी मला उमेदवारी दिली. राष्ट्रवादी, आरपीआय, शिवसेना, रासप आणि स्वर्गीय मेटे साहेबांचा शिवसंग्राम पक्षदेखील आपल्या सोबत असल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी खा. डाॅ. प्रीतम मुंडे, आ. सुरेश धस, माजी आ. भीमराव धोंडे, आ. नमिता मुंदडा, माजी आ. केशव आंधळे, आर. टी. देशमुख, जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, रमेश आडसकर, अक्षय मुंदडा, सर्जेराव तांदळे, जयदत्त धस, अजय धोंडे, विजयकुमार गोल्हार आदींची उपस्थिती होती.
जानकर, मेटेंचा शिवसंग्रामही सोबत?धामणगाव येथील सभेत पंकजा मुंडे यांनी महादेव जानकर यांचा रासप आणि स्व. विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्षही सोबत असल्याचे विधान केले. वास्तविक, जानकर हे भाजपवर सडकून टीका करत महाविकास आघाडीसोबत जाण्याची तयारी करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला स्व. मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांचीच पंकजा मुंडे यांच्या विरोधात उमेदवारीसाठी चर्चा होत आहे. असे असताना पंकजा यांच्या विधानाने शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
निवडणुकीत जातीआधारित चर्चा का व्हावी?राज्यातील लोक माझ्यावर प्रेम करतात. मला मिळालेल्या संधीमुळे लोकांमध्ये उल्हास आहे. जातीवर आधारित माझ्याविरोधात उमेदवार दिला जाईल असे सांगितले जात आहे. पण, माझ्या आयुष्यात जातीचा कधी विषय आला नाही. मी मुरलीधर मोहोळ, सुजय विखे पाटील यांना शुभेच्छा देते. ते म्हणतात की, ताई तुमच्या सभेने आमचा विजय निश्चित होतो. पण बीड जिल्ह्यातील निवडणुकीत जातीआधारित चर्चा का व्हावी? ही निवडणूक अनुभवावर, काम करण्याची कार्यक्षमता यावरच लढवली जावी. जातीच्या आधारावर ही निवडणूक लढवली जाते की काय? हा विचार मनाला थोडा खिन्न करतो, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.