- अनिल लगड
बीड : जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीचे निकाल बुधवारी सकाळी जाहीर झाले. यात वडवणी, केजमध्ये सत्तांतर झाले आहे. आष्टी, पाटोदा, शिरूरकासारमध्ये भाजपने सत्ता कायम राखली आहे. वडवणीत राष्ट्रवादी व राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवारांमुळे सत्तांतर झाले आहे. केजमध्ये जनविकास परिवर्तन आघाडीने बहुमत मिळवत सत्ताधारी काँग्रेसला धक्का दिला आहे.
वडवणीत भाजपच्या राजाभाऊ मुंडे गटाचा पराभव झाला. वडवणीत राष्ट्रवादीचे माजीमंत्री प्रकाश सोळंके यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. वडवणीत राष्ट्रवादी काँग्रेसने १७ पैकी भाजपला ८, राष्ट्रवादीला ६ व राष्ट्रवादी पुरस्कृत ३ उमेदवार विजयी झाले आहेत.
केजमध्ये सत्ताधारी काँग्रेसला जनविकास परिवर्तन आघाडीने धक्का दिला. खासदार रजनी पाटील व अशोक पाटील यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. जनविकास आघाडीला ८ जागा, काँग्रेसला ३, राष्ट्रवादीला ५. स्वाभिमानी एक जागेवर विजय मिळाला. जनविकास आघाडी नेते हारूण इनामदार हे पराभूत झाले. तर बजरंग सोनवणे यांची मुलगी पराभूत झाली. भाजप नेते रमेश आडसकर, हारूण इनामदार, अंकुश इंगळे यांनी जनविकास आघाडी करुन निवडणूक लढविली होती. यात त्यांना यश आले.
आष्टीत भाजपचे माजीमंत्री सुरेश धस गटाला सत्ता राखण्यात यश मिळाले. राष्ट्रवादीचे सत्ताधारी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या महाविकास आघाडीचा पराभव झाला. येथे भाजप १०, राष्ट्रवादी २, अपक्ष ४, काँग्रेस १ जागा मिळाली.
पाटोदा नगरपंचायतीतही आमदार सुरेश धस यांनी सत्ता कायम राखली आहे. आमदार आजबे गटाला दोन जागेवर समाधान मानावे लागले. भाजपला ९ जागा अपक्षाला ६ काँग्रेसला १, राष्ट्रवादीला १ जागा मिळाली. सहा अपक्षांमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवारांच्या समावेश आहे.
शिरूरकासारमध्येही सुरेश धस यांनी सत्ता कायम राखली आहे. येथे भाजपने ११ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. शिवसेनेला २ तर राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या.