परळी : येथील भिमानगर -बरकत नगर भागातील रेल्वे पटरी जवळ बाभळीच्या झाडांमध्ये नवजात स्त्री जातीच्या शिशूस टाकून पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आला होता. या प्रकरणी संभाजीनगर पोलिसांनी भिमानगरमधील एका १७ वर्षीय वर्षीय मुलीस तीच्या आईच्या घरातून मंगळवारी दुपारी ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरु आहे. या प्रकरणाचा पोलिसांच्या डीबी पथकाने चोवीस तासाच्या आत छडा लावला आहे.
येथील संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार ,शहरच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षका आरती जाधव, संभाजीनगर चे पोलीस उपनिरीक्षक चांद मेंडके, डी बी पथकाचे जमादार रमेश सिरसाठ, दत्ता गीते , सचिन सानप यांनी मंगळवारी शहरातील काही खाजगी दवाखान्याची तपासणी केली. त्यानंतर परळीच्या उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली येथे सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास एक महिला प्रसूती उपचारांसाठी आली होती,अशी माहिती मिळाली, सदरील महिलेस वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला होता परंतु सदरील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती न करता आईच्या घरी गेली. तेथेच तिची प्रसूती झाली असा प्रकार पुढे आला आहे. यावेळी जन्मलेले बाळच फेकून देण्यात आले होते.
दरम्यान, . या नकोशीची तब्येत अत्यंत नाजूक असून तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान, या मुलीच्या संगोपनाची संपूर्ण जबादारी खा. सुप्रिया सुळे आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वीकारली असून तिचे ‘शिवकन्या’ असे नामकरण करण्यात आले आहे.