अनिल भंडारी
बीड : अफगाणिस्तानातील तणावग्रस्त वातावरणामुळे भारतात आयात केल्या जाणाऱ्या अफगाणी सुक्या मेव्याचे दर जवळपास ४० टक्क्यांनी महागले आहेत. त्यामुळे इम्युनिटी वाढीसाठी सुका मेवा खरेदी करणाऱ्या ग्राहकांची पंचाईत झाली आहे; तर अफगाणिस्तानातील वातावरणाचे कारण सांगून इतर देशांतून आयात होणारा सुका मेवादेखील वाढीव दराने विकला जात आहे. येथील बाजाराचा कानोसा घेतला असता अफगाणिस्तानातील वातावरणाचा परिणाम दोन-तीन आठवड्यांनंतर जाणवेल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तेथून आयात होणाऱ्या सुक्या मेव्याचे दर आणखी वाढू शकतात. सुका मेवा महागल्याने आगामी हिवाळ्यात पौष्टिकतेसाठी खरेदी करणाऱ्या सामान्यांची मात्र परवड होणार आहे.
हे पाहा भाव (प्रतिकिलो)
तणावापूर्वीचे भाव सध्याचे भाव
खिसमिस ४८० -- ६४०
अंजीर ९०० -- १२००
काळा मनुका ३५० -- ५००
लाल मनुका ६०० -- ७००
तीन महिने पुरेल इतका स्टॉक
कोरोनामुळे बाजारपेठ थंडावलेली आहे. सुक्या मेव्याची विक्री आहे तेवढीच होत आहे. अफगाणी शहाजिरा, काळा मनुका, अंजीर, किसमिस, लाल मनुकांचा स्टॉक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडे बऱ्यापैकी असल्याने दोन-तीन महिने फार काही फरक पडणार नसल्याचे व्यापारी सांगतात.
दर पूर्ववत होणे कठीण
अफगाणी सुका मेव्यासाठी भारतच सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. अफगाणिस्तानातील वातावरणाचा काही अंशी दोन-तीन महिने परिणाम राहू शकताे, सुका मेव्याचे दर वाढू शकतात. आयात, निर्यात धोरण व बाजारातील स्थितीवर बरेच अवलंबून आहे.
- प्रदीप सारडा, व्यापारी, बीड.
---------
सध्या अफगाणिस्तानशिवाय इतर देशांतून येणारा सुका मेवादेखील कमालीचा महाग झाला आहे. याचे कारण कोणीच सांगत नाही. भांडवली गुंतवणूकही जास्त असल्याने धाडस कोणी करीत नाही. स्टॉकही फारसा नाही. ग्राहकांना मात्र आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
- गंगाबिशन करवा, व्यापारी, बीड.
----------