- संतोष स्वामी दिंद्रुड (बीड): गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर लहान बाळांचे नामकरण हे सर्वश्रुत आहे. परंतु, माजलगाव तालुक्यातील चोपनवाडीच्या शेतकऱ्याने चक्क लाडक्या बोकडाचे नामकरण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केले. या आगळ्यावेगळ्या सोहळ्याने बीड जिल्ह्यात आता 'चेतक' हा बोकड चर्चेत आहे. दरम्यान या घटनेची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा रंगली आहे.
माजलगाव तालुक्यातील चोपनवाडी येथील विठ्ठल डीसले या शेतकऱ्याने जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय जोपासला आहे. यातच त्यांनी नऊ महिन्याचा बिटल जातीचा बोकड तब्बल सत्तर हजार रुपयांत खरेदी केला. दरम्यान, या लाडक्या बोकडाचे नामकरण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्याचा डीसले यांनी ठरवले. बुधवारी (दि.२२) सकाळी गुढी उभारून डिसले यांनी स्वतःच्या शेतात बोकडाचा नामकरण सोहळ्याची जय्यत तयारी केली.
यावेळी बोकडाच्या गळ्यात पुष्पहार, पितळाची जाड साखळी, समोरच्या दोन्ही पायात पितळाचे तोडे, शरीराला चार-पाच ठिकाणी फित बांधून त्याला सजवण्यात आले. त्यानंतर महिलांनी गंध, गुलाल वाहून बोकडाचे औक्षण केले. त्यानंतर लाडक्या बोकडाचे 'चेतक' असे नामकरण झाल्याचे जाहीर करण्यात आले. या सोहळ्याला डीसले परिवारातील महिला, लहान मुले, शेजारील शेतकरी व शेळीपालन व्यवसाय करणारे सहभागी झाले होते. नामकरण सोहळ्यानंतर अल्पोपहाराचीही सोय डीसले परिवाराने केली होती.
प्रशंसनीय सोहळाअनेकजण पशुपालन हा जोडधंदा म्हणून करतात. मुक्या जनावरांचे पालन पोषण करतांना अनेकदा त्यांच्यावर जीव जडतो. हे प्राणी आपल्या कुटुंबातील सदस्य बनतात. 'हौसेला मोल नाही' या उक्तीप्रमाणे डिसले परिवाराने बोकडाच्या नामकरणाचा आगळावेगळा कार्यक्रम पार पाडला, हे प्रशंसनीय आहे. - बंडू जी. खांडेकर (मराठवाडा अध्यक्ष - भाजप भटके विमुक्त आघाडी)