नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 07:27 PM2024-05-31T19:27:10+5:302024-05-31T19:31:07+5:30

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज बीडमधील दुष्काळी भागाचा दौरा केला.

Nana Patole called the Chief Minister directly from the farm What happened next | नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?

नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?

Congress Nana Patole ( Marathi News ) : राज्यात सध्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची स्थिती भीषण झाली आहे. मागील वर्षी कमी पाऊस पडल्याने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आता पाणीटंचाईची समस्या जाणवत आहे. पाणी नसल्यामुळे शेतातील उभे पिके करपत आहेत, तर जनावरांच्याही चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज बीडमधील दुष्काळी भागाचा दौरा केला. या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन पाहणी केल्यानंतर पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना फोन केला. मात्र या दोघांचेही फोन बंद आल्याने पटोले यांनी नाराजी व्यक्त केली.

दुष्काळाविषयी बोलताना नाना पटोले म्हणाले की, "आम्हाला या विषयाचं राजकारण करायचं नाही. मात्र शेतकऱ्यांच्या वेदना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे कृषीमंत्री तथा बीडचे पालकमंत्री असणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पोहोचाव्यात, हा आमचा प्रयत्न आहे. यासाठी मी गाडीतून येत असतानाही मुख्यमंत्र्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र त्यांचा फोन बंद आहे. कृषीमंत्र्यांचाही फोन बंद आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती भयावह आहे, बँका कर्ज द्यायला तयार नाहीत, त्यामळे शेतकरी पुन्हा सावकाराच्या दारात जात आहे. बियाणांचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या सगळ्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने पाहायला हवं," अशी मागणी पटोलेंनी केली आहे. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विश्रांतीसाठी सातारा येथील आपल्या मूळ गावी गेले होते.' लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला. यावेळी शेतशिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली. जीवाला जीव देणाऱ्या गाई गुरांची चौकशी करून त्यांना प्रेमाने दोन घास खाऊ घातले. तसेच शेतात जाऊन चिकू, फणस, सुपारी आणि भाज्यांच्या लागवडीची पाहणी केली. इथली माती माझ्या मनाला शांतता देतेच पण पुन्हा एकदा नव्या जोमाने नवी आव्हाने सर करण्याचे बळही देते," असं मुख्यमंत्र्यांनी एक्स अकाऊंटवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी अहिल्यानगर येथील चौंडी या अहिल्यादेवी यांच्या जन्मगावी गेले होते. 

Web Title: Nana Patole called the Chief Minister directly from the farm What happened next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.