परळी (बीड ) : येथील रेल्वे स्थानकातून निघालेल्या नांदेड- बेंगलोर एक्सप्रेस रेल्वेच्या इंजिनमध्ये सकाळी ९.१५ च्या दरम्यान बिघाड झाला. यानंतर रेल्वे परत( रिव्हर्स ) परळी रेल्वे स्थानकात आणण्यात आली. येथे दुसरे इंजिन लावून पुन्हा गाडीस रवाना करण्यात आले. या प्रकारामुळे प्रवाश्यांचा मात्र चांगलाच गोंधळ उडाला.
या बाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी सकाळी परळी रेल्वेस्थानक प्लॅटफॉर्मक्रमांक 3 वर नांदेड- बेंगलोर ही रेल्वे गाडी आली आणि सकाळी ८.४० वाजता सुटली. दहा किलोमीटरच्या अंतरावर घाटनांदूर मार्गाने धावत असताना इंजिन अचानक बंद पडले. त्यानंतर रेल्वे परळी रेल्वे स्टेशनवर परत आणण्यात आली. येथे दुसरे इंजिन लावून ही रेल्वे ११. ३० वाजेच्या दरम्यान पुन्हा रवाना करण्यात आली.
दरम्यान, रेल्वे इंजिनच्या तपासणीसाठी सिकंदराबाद विभागाचे कर्मचाऱ्यांचे कार्यालय परळी रेल्वे स्टेशन येथे आहे. या विभागाचे कर्मचारी फक्त टायर चेक करतात. रेल्वे इंजिन पूर्ण तपासत नाहीत अशी चर्चा प्रवास्यांमध्ये ऐकावयास मिळाली. तसेच यात चूक कोणाची, इंजिनमध्ये बिघाड का झाला, रेल्वे रिव्हर्स आणण्याचे खरे कारण काय, याबाबतीत रेल्वेचे अधिकारी स्पष्टीकरण द्यावे असे अनके प्रश्न यावेळी प्रवाश्यांनी उपस्थित केले.