अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयातील ५६ डॉक्टरांना मुंबई येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, हा निर्णय अन्यायकारक असून ग्रामीण भागातील रूग्णसेवा विस्कळीत करणारा आहे. त्यामुळे पर्यायी डॉक्टरांची व्यवस्था झाल्याशिवाय स्वारातीमधील डॉक्टरांना मुंबईला हलविण्यात येऊ नये अशी मागणी करत आ. नमिता मुंदडा यांचे सासरे तथा ज्येष्ठे नेते नंदकिशोर मुंदडा यांनी अधिष्ठाता कार्यालयासमोर शनिवारी सकाळपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे.
स्वाराती रूग्णायलयात ५१८ खाटांना परवानगी आहे. परंतु येथील दररोजची ओपीडी २ हजारापेक्षाही अधिक आहे. नियमितपणे सातशेपेक्षा अधिक रूग्ण ॲडमिट असतात. रूग्णालयासाठी अपेक्षित असलेल्यापैकी सध्या ३५ टक्के डॉक्टरांची कमतरता आहे. त्यातच सध्या शासनाने स्वारातीमध्ये कोरोना रूग्णांसाठी वाढीव तिनशे खाटांची सोय केली आहे. सध्या आहे तेच डॉक्टर या वाढीव खाटांसाठी वापरले जाणार आहेच. वास्तविक पाहता स्वाराती रूग्णालयाला अतिरिक्त डॉक्टर आणि कर्मचारी देण्याची गरज होती, परंतु उफराटा निर्णय घेत शासनाने येथील ५६ डॉक्टरांना मुंबईला प्रतिनियुक्तीवर पाठविण्याचे आदेश दिले आहेत. हे सर्व डॉक्टर दररोज ओपीडी आणि शस्त्रक्रीया विभागात काम करणारे असल्याने याचा विपरित परिणाम स्वारातीमधील दैनंदिन तसेच संभाव्य कोरोना रूग्ण सेवेवर होणार आहे. त्यामुळे या डॉक्टरांना इथून हलवयाचे असेल तर आधी स्वारातीसाठी पर्यायी डॉक्टर उपलब्ध करून द्या अशी भुमिका नंदकिशोर मुंदडा यांनी घेतली आहे.
शुक्रवारी रात्रीच्या बैठकीचे फलित न निघाल्याने आणि डाॅक्टरांना कुठल्याही क्षणी मुंबईला रवाना करण्यात येऊ शकते याची कुणकुण लागल्याने मुंदडा शनिवार सकाळपासून कार्यकर्त्यांसह अधिष्ठाता कार्यालयाबाहेर ठिय्या देवून बसले आहेत. त्यांच्यासमवेत नगरसेवक शेख रहिम, सारंग पुजारी, संतोष शिनगारे, दिनेश भराडिया, ॲड. संतोष लोमटे, हिंदुलाल काकडे, प्रशांत आदनाक, शरद इंगळे, शिवाजी पाटील, सुदाम पाटील, नूर पटेल, ताहेर भाई, योगेश कडबाने यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संजय साळवे, राजेश वाहुळे आदी उपस्थित होते.