पक्षकारांनी त्यांची न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तडजोडीने मिटवण्यासाठी येणाऱ्या राष्ट्रीय लोकन्यायालयात ठेवावीत.या प्रकरणात तडजोड झाल्यास शंभर टक्के न्यायालयीन शुल्क परत मिळते. १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व सत्र न्या. तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष हेमंत श. महाजन, जिल्हा सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव सिद्धार्थ ना.गोडबोले, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड एस.के. राऊत यांनी केले आहे.
ही प्रकरणे ठेवली जाणार
राष्ट्रीय लोकन्यायालयात दाखलपूर्व प्रकरणे, धनादेश अनादराची प्रकरणे, दिवाणी दावे, बँकांची कर्ज प्रकरणे, कौटुंबिक कलहाची प्रकरणे, भूसंपादनाची प्रकरणे, दूरध्वनी देयकाची प्रकरणे, नगरपालिका, ग्रामपंचायत, विद्युत महामंडळ, राज्य परिवहन महामंडळ इत्यादी तडजोडीजन्य प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.