माजलगांव ( बीड), दि. ९ : पहिल्या टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंच पद हे थेट जनतेतुन असल्यामुळे कोणत्या ग्रामपंचायती कोणाकडे जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मागील दहा वर्षांपासून तालुक्यातील जवळपास 90 टक्के ग्रामपंचायतींवर माजी मंत्री प्रकाश सोळंके गटाचे वर्चस्व होते. मात्र, या निवडणुकीत भाजपा व जगताप मित्र मंडळाने मुसंडी मारल्यामुळे राष्ट्रवादीची किंचित पिछेहाट झाल्याचे दिसुन येत आहे.
पहिल्या टप्प्यात माजलगांव तालुक्यात 44 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. सरपंच पद हे पहिल्यांदाच जनतेतुन असल्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुका हया आगामी काळात येणा-या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणुन पाहिले जात होते. माजी मंत्री प्रकाश सोळंके हे या आधी येथे सलग 15 वर्षे आमदार राहिले होते. यामुळे तालुक्यातील जवळपास 90 टक्के ग्रामपंचायती या त्यांच्याच ताब्यात होत्या.
सोळंके यांची आमदारकी गेल्यानंतर जिल्हा परिषदेत त्यांनी एकहाती अंमल दाखवत सर्वच जागा निवडुन आणल्या होत्या त्यामुळे प्रकाश सोळंके यांचे ग्रामिण भागातील प्राबल्य पुन्हा सिध्द होतांना दिसले. जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या पराभवानंतर आमदार आर.टी. देशमुख यांनी ग्रामपंचायतनिहाय लक्ष देण्यास सुरुवात केली तसेच गाव पातळीवर कोणासोबतही युती न करता स्वबळावर निवडणुक लढविण्याचा निर्धार केला. याचा फायदा आर.टी. देशमुखांना या निवडणुकीत पहावयास मिळाला.
तालुक्यात गांव पातळीवर कुठेही अस्तित्वात नसलेल्या भाजपाने तालुक्यातील 30 ते 35 टक्के जागांवर यश मिळवुन भाजपाचा झेंडा रोवला. दुसरीकडे मोहन जगताप मित्र मंडळाने देखील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करत चार ठिकाणी आपले सरपंच निवडुन आणण्यात यश मिळविले. भाजपा आणि मोहन जगताप मित्र मंडळाने मिळविलेल्या या जागा पूर्वी प्रकाश सोळंके यांच्या ताब्यात असल्याने प्रकाश सोळंके यांना मोठा फटका सहन करावा लागला.
44 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांपैकी सादोळा, आबेगांव, बोरगांव, सुलतानपुर, सोन्नाथडी, मोठीवाडी आदी लोकसंख्येने मोठया असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये मोठी अटीतटीची लढत पहावयास मिळाली तर अनेक ठिकाणी क्राॅस व्होटींगमुळे सरपंच एका गटाचा तर इतर सदस्य दुस-या गटाचे असा प्रकार पहावयास मिळाला. सध्याची निकालाची स्थिती अशी : राष्ट्वादी - १५, भाजपा - ११, मोहन जगताप - ४, उर्वरित पंचायतींची मतमोजणी सुरु आहे.