अनेक दुकानांमध्ये पाणीच पाणी : व्यापाऱ्यांतून संताप
माजलगाव
: शहरात निकृष्ट झालेल्या रस्त्याच्या कामामुळे व्यापाऱ्यांना पावसाळा येताच मोठा त्रास सहन करावा लागतो. रविवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे संभाजी चौक व शिवाजी चौक या ठिकाणी मुख्य रस्त्यावर तलावाचे स्वरूप आले होते. अनेक दुकानदारांच्या दुकानांमध्ये पाणी घुसल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शहरातील खामगाव-पंढरपूर या सिमेंट रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले होते. काम सुरू असतानाच अनेक संघटनांनी हे काम निकृष्ट होत असल्याचा आवाज उठवला होता; परंतु काही राजकीय मंडळींच्या आशीर्वादामुळे संबंधित गुत्तेदाराने हा रस्ता व नाल्याचे काम थातुरमातुर करून उरकला. रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था न केल्याने व नाल्या एकमेकाला न जोडल्याने मुख्य रस्त्यावर पाणी साचते व अनेकांच्या दुकानांमध्ये शिरते. शिवाजी चौकातील अनेक दुकानांत रविवारी दुपारी झालेल्या पावसाने मुख्य रस्त्यावर दोन फूट पाणी दिसत होते. संभाजी चौकात साचलेले पाणी जाण्यासाठी नालीच नसल्याने याठिकाणचे पाणी जाणे मुश्कील होते. यामुळे या ठिकाणी तलावाचे स्वरूप आले होते.
-------
अधिकाऱ्यांनी आमदारांचेही ऐकले नाही
येथील आ. प्रकाश सोळंके यांनी दोन वर्षांपूर्वी व्यापाऱ्यांच्या तक्रारीवरून संबंधित विभागाच्या अभियंत्यास बोलावून या नाल्या जोडण्यास सांगितले होते. या घटनेला दोन वर्ष पूर्ण झाले तरी संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी याकडे ढुंकूनही पाहिले नाही. यानंतर आमदारांनीदेखील काहीच आवाज उठवला नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
------------
050921\0504img_20210723_161624_14.jpg~050921\0505img_20210905_164834_14.jpg