अंबाजोगाई : सतत पडत असलेल्या पावसामुळे येथील यशवंतराव चव्हाण चौकाच्या बाजूस असलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानास तलावाचे स्वरूप आले आहे. यामुळे मैदानावर मॉर्निंग वॉक करण्यासाठी येणाऱ्या शेकडो लोकांची फजिती झाली.
अंबाजोगाई शहरातील शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा गुण वृध्दिंगत व्हावेत, यासाठी तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. विमल मुंदडा यांनी या शहरासाठी तालुका क्रीडा संकुलाची मंजुरी मिळवली. शासन स्तरावर आपले राजकीय वजन वापरून अत्यंत महत्त्वाच्या लोकेशनवर या क्रीडा संकुलासाठी जागाही उपलब्ध करून दिली. या ठिकाणी तालुका क्रीडा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. क्रीडा संकुल उभारण्यासाठी शासनाचा मोठा निधीही उपलब्ध करून दिला.
मात्र, डॉ. विमल मुंदडा यांच्या निधनानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत या क्रीडा संकुलाच्या सुरू करण्यात आलेल्या बांधकामाच्या वेळेस रस्त्याच्या उंचीपासून बरेच फूट खाली असलेली क्रीडा संकुलाची जागा रस्त्याच्या उंचीच्या वरपर्यंत भरून न घेता मूळ लेवलवरच या संकुलाचे बांधकाम करण्यात आले. परिणामी पावसाळा आला की, या तालुका क्रीडा संकुलाला एका तळ्याचे स्वरुप निर्माण होते.
सोमवारी अंबाजोगाई महसूल मंडलात झालेल्या अतिवृष्टीमुळे या क्रीडा संकुलात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले असल्यामुळे या संपूर्ण जागेला तळ्याचे स्वरुप निर्माण झाले होते. क्रीडा संकुलाच्या या जागेवर साचणाऱ्या पाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी येथे रोज सकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या लोकांकडून करण्यात येत आहे.
020921\img-20210902-wa0075.jpg
क्रीडासंकुल