बीड : आम्ही झाडे लावणार, संगोपन करणार, असे अभिवचन देत शेकडो विद्यार्थी, निसर्गप्रेमींनी झाडांना मैत्रीचे प्रॉमिस देत आगळावेगळा व्हॅलेंटाईन साजरा केला. बीड येथील पालवण परिसरातील सह्याद्री देवराई येथे दोन दिवसीय वृक्ष संमेलनाचा समारोप शुक्रवारी सायंकाळी गरूड निसर्गात सोडून करण्यात आला.संमेलनासाठी राज्याच्या विविध भागातून तसेच जिल्हाभरातून पर्यावरण प्रेमींनी मोठी हजेरी लावली. सिने अभिनेते सयाजी शिंदे, सिने लेखक अरविंद जगताप, महाराष्ट्रातील २४ ठिकाणच्या सह्याद्री देवराई परिवाराचे सदस्य, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक व निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरूवातीपासून समारोपापर्यंत आपल्या स्टाईलने आकर्षित करीत सयाजी शिंदे यांनी वृक्ष लागवडीची तळमळ दर्शवली. त्याचबरोबर प्रत्येकाने पाच पाच झाडे लावण्याचे आवाहनही केले. या कार्यक्रमात पालवण येथील जेसीबी चालक महेश, गायक शैलेंद्र निसर्गंध, राजू शिंदे, अनिल धायगुडे, विजय शिंदे, बाळू तिवारी, वन अधिकारी अमोल सातपुते, मधुकर तेलंग, सर्पराज्ञीचे सिध्दार्थ व सृष्टी सोनवणे, रवींद्र बनसोड, संजय तांबे, दिगंबर खंदारे, जगदाळे यांच्यासह विविध ठिकाणाहून सायकलवर आलेल्या तरूणांचा आणि वृक्ष संवर्धन चळवळीत योगदान देणाऱ्या विविध ठिकाणच्या पर्यावरणप्रेमींचा सत्कार झाला. तज्ज्ञांचे कौतूक करताना ही सगळी आपली माणसे आहेत असा उल्लेख करीत शिंदे यांनी वृक्ष लागवडीचे आवाहन केले.
वनदूत रमला चिमुकल्यांमध्ये...सह्याद्री देवराई परिसरातील वृक्ष संमेलनाच्या दुसºया दिवशी सकाळी शहरातील विविध शाळांमधील मुले-मुली मोठ्या संख्येने दाखल झाली. दिवसभरातील कार्यक्रमात सुरूवातीपासून समारोपापर्यंत सिने अभिनेते सयाजी शिंदे विद्यार्थी, निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमींमध्ये रमले. प्रत्येकाने पाच झाडे लावण्याचे आवाहन करताना सह्याद्री देवराईच्या गाण्यावर विद्यार्थ्यांसमवेत सयाजी शिंदेंनी देखील ताल धरला.