बीड : वाळूने भरलेला हायवा ट्रक सोडण्यासाठी १ लाख रूपयांची लाच खाजगी इसमामार्फत घेताना गेवराई येथील नायब तहसीलदारास बुधवारी दुपारी रंगेहाथ पकडण्यात आले. माजीद शेख असे खाजगी दलालाचे तर प्रल्हाद लोखंडे असे नायब तहसीलदाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तहसील परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारा वाळूने भरलेला एका हायवा ट्रक महसूल पथकाने ताब्यात घेतला होता. हा ट्रक सोडण्यासाठी ट्रक मालकास नायब तहसीलदार प्रल्हाद लोखंडे यांनी १ लाख रूपयांची लाच मागितली. लोखंडे याने माजीद शेख हा खाजगी इसम वसुलीसाठी नियूक्त केला होता. याबाबत ट्रक मालकाने लाच लुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करून बीडच्या पथकाने बुधवारी गेवराई येथे सापळा रचला. यावेळी ट्रक मालकाकडून लाच स्वीकारताना खाजगी दलाल माजीद शेख व नायब तहसीलदार लोखंडे यांना पथकाने रंगेहाथ पकडले. बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने गेवराई येथे बुधवारी दुपारी ही कारवाई झाली.