- मधुकर सिरसट केज (बीड): येथील महिला नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांचा दोरीने गळा आवळून, अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच आरोपी विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी वाघ यांच्या नात्यातीलच आहेत.
शुक्रवारी ( दि. २०) रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान केज तहसीलच्या संजय गांधी व श्रावण बाळ योजना विभागाच्या नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड या बीड रोड लगत असलेल्या त्यांच्या निवास्थानी दुपारचे जेवण करून तहसील कार्यालयाकडे आपल्या मोपेडवरून जात असताना, चारचाकी गाडीतून आलेली त्यांची भावजयी सुरेखा मधुकर वाघ, तिचा भाऊ हरिदास भास्कर महाले आणि आई मुंजाबाई भास्कर महाले आणि एक अनोखी महिला व वाहन चालक यांनी त्यांना रस्त्यात अडवून जळगाव जिल्ह्यातील दोनडिगर येथील जमिनीच्या हक्क सोड पत्रावर सही करण्यासाठी जबरदस्ती केली.
तसेच सहा महिन्यापूर्वी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या भावाची जेल मधून सुटका करण्यासाठी पोलीस केस मागे घे, असे बोलतानाच त्यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी आशा वाघ-गायकवाड यांच्या गळ्यात दोरी टाकून गळा आवळण्यात आला. हरिदासने पेट्रोल व ज्वलनशील द्रवपदार्थ अंगावर टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, आशा वाघ- गायकवाड यांनी आरडा ओरड करून रस्त्या लगतच्या हॉटेलच्या दिशेने पळाल्या, दरम्यान हल्लेखोर बीडच्या दिशेने वाहनातून पळून गेले.
नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी गु र नं 29/2023 भा दं वि 307 आणि 34 नुसार जिवे मारण्याचा प्रयत्न करणे या आरोपाखाली सुरेखा मधुकर वाघ, हरिदास भास्कर महाले, मुंजाबाई भास्कर महाले एक अनोळखी महिला व पुरुष या पाच जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आंनद शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.
आरोपींवर कठोर कारवाई करा या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या सदस्य ॲड. संगिता चव्हाण आणि राष्ट्रवादी महिला आघाडीच्या संगिता तुपसागर-भोसले यांनी महिला नायब तहसीलदार आशा वाघ.. गायकवाड यांची भेट घेऊन चौकशी केली. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघामोडे यांच्याकडे आरोपींविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली.