बीड : आगामी लोकसभा निवडणूकीसाठीराष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. यात बीड लोकसभेसाठी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून उमेदवारीवरून सुरु असलेल्या तर्क-वितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.
गुरुवारी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी शरद पवार यांच्या उपस्थितीत उमेदवार निवडीसाठी बैठक झाली होती. या बैठकीस माजी मंत्री प्रकाश सोळंके, माजी आ. अमरसिंह पंडित, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, अक्षय मुंदडा, संदीप क्षीरसागर उपस्थित होते. यात गेवराईचे माजी आ. अमरसिंह पंडित आणि बजरंग सोनवणे यांच्या उमेदवारीसंदर्भात चर्चा झाली असली तरी अमरसिंह पंडित हेच प्रबळ उमेदवार ठरू शकतात, असा चर्चेचा सूर होता. दोनच नावे चर्चेला आल्यामुळे गुरुवारी सायंकाळी जाहीर होणाऱ्या पहिल्या यादीत बीडचा उमेदवार असेल, असे वाटत होते. परंतु पक्षाच्या पहिल्या यादीतील ११ उमेदवारांत बीडचे नाव नव्हते.
यानंतर आज दुपारी पक्षाने राज्यातील पाच जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली. या यादीमध्ये बीडच्या जागेसाठी पक्षाने जिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्याशी जिल्हाध्यक्ष सोनवणे यांची थेट लढत होईल. जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस अनेक गटांमध्ये विखुरलेली आहे. यामुळे सोनवणे यांच्या उमेदवारीस जिल्ह्यातील मातब्बर नेते किती आणि कसे बळ देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
लढण्यास क्षीरसागर- मुंडे नव्हते उत्सुकसंभाव्य उमेदवारांमध्ये पक्षाचे उपनेते जयदत्त क्षीरसागर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित या नावांची प्रमुख चर्चा होती. परंतु जयदत्त क्षीरसागरांनी लोकसभा लढविण्यास यापूर्वीच स्पष्ट नकार दिला होता. विशेष म्हणजे आजच्या बैठकीसही ते अनुपस्थित राहिले. धनंजय मुंडे हे पक्षाचे प्रमुख स्टार प्रचारक असल्यामुळे त्यांना जिल्ह्यातच अडकून ठेवणे पक्षाला कदाचित उचित वाटले नसावे. विशेष म्हणजे उमेदवारीसाठी धनंजय मुंडे यांनीही फारसा उत्साह दाखविला नाही.
बैठकीत दोनच नावांवर झाली चर्चा महिनाभरापासून बीडचे राकाँ जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांचेही नाव चर्चेत आले होते. त्यांनी लोकसभेचा संभाव्य उमेदवार या थाटात मतदारांशी संपर्कही वाढविला आहे. परंतु कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मते भाजपच्या उमेदवारास अमरसिंह पंडित हेच तुल्यबळ लढत देऊ शकतात, अशी चर्चा बारामतीपर्यंत पोहचली. पंडित यांच्याकडे राजकीय वारसा आहे. साखर कारखाना, शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून तगडी यंत्रणा आहे. निवडणूक लढविण्यासाठी जे डावपेच, यंत्रणा राबवावी लागते ते सर्व काही त्यांच्याकडे आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत केवळ दोन नावावरच चर्चा झाली असतानाही पहिल्या यादीत नाव जाहीर न झाल्यामुळे शरद पवार आणि पक्षश्रेष्ठीच्या मनात ही लढत तूल्यबळ होण्यासाठी काही विचार आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, आज पक्षाने सोनवणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.