बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत असतात. बीड जिल्ह्यातील वडवणी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारावेळी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली होती. यालाच त्याच भाषेत धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली. तो पराभव विसरलात का, अशी खोचक विचारणा धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना केली.
मी मंत्रीपदी होते, तेव्हा पहिल्या चार मंत्र्यांमध्ये माझा समावेश होता. थेट ३२व्या क्रमांकापर्यंत माझे मंत्रीपद कधीच गेले नाही, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. या टीकेच सव्याज परतफेड धनंजय मुंडे यांनी केली आहे. २०१९मध्ये तुम्हाला औकात दाखवली ते विसरलात का, असे प्रत्युत्तर धनंजय मुंडे यांनी दिले आहे.
सामाजिक न्याय खात्याचा तुम्ही अपमान करताय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचितांच्या विकासासाठी स्वतः सामाजिक न्याय व विशेष सहाय्य खाते सुरु केले, त्यांच्यावर तुम्ही टीका करताय. तुम्ही परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेबांचा याद्वारे अपमान केला आहे, असे सांगत तुम्ही महिला व बालविकास मंत्री होत्या, ग्रामविकास मंत्री होत्या, महाराष्ट्राच्या नेत्या होतात, तेव्हा विधानसभा निवडणुकीत परळीतील जनतेनी तुम्हाला तुमची औकात दाखवली आहे. माझी ५०० कोटी रुपये आणण्याची औकात आहे, नगदी हिशेब देऊ का, असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नगरपंचायत निवडणुकीत पाच ठिकाणी निवडून दिले, तर १०० कोटी रुपयांचा निधी देऊ, असे आश्वासन दिले असून, यावर पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, पाच ठिकाणची आश्वासने मिळून ५०० कोटी रुपये निधी होतो. ५०० कोटी रुपये आणण्याची यांची ताकद तरी आहे का, अशी खोचक विचारणा पंकजा मुंडे यांनी केली होती.
दरम्यान, जानेवारी महिन्यात बीड जिल्ह्यातील वडवणी, आष्टी, पाटोदा, शिरूर, केज येथील नगरपंचायतीच्या निवडणूका होणार आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने भाजपने येथे चांगलीच रणनीती आखली आहे. तसेच महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनीही धडाकेबाज प्रचार सुरु केला आहे.