परळी : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे टोकवाडी येथील बालाजी मुंडे यांची गुरुवारी ( दि. २१ ) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उर्मिला गित्ते यांच्यावर अविश्वास ठराव संमत करण्यात आल्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली होती.
परळी पंचायत समितीच्या नवीन सभापती पदाच्या निवडीसाठी गुरुवारी पंचायत समिती सभागृहात सदस्यांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. उर्मिला गित्ते यांच्यावर अविश्वास ठराव संमत करण्यात आल्यानंतर सभापतीपदाच्या रिक्त झालेल्या जागे करिता ही विशेषसभा जिल्हाधिकारी बीड यांच्या सुचनेनुसार घेण्यात आली. पंचायत समिती सभागृहात सदस्यांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे पिठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होत्या.
पंचायत समितीवर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंचे वर्चस्व आहे. त्यांच्या सूचनेनुसार बालाजी मुंडे यांची सभापती पदी निवड करण्यात आली. सभापती पदासाठी बालाजी मुंडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बालाजी उर्फ मुंडे हे पंचायत समितीचे उपसभापती होते त्यांना सभापती करून राष्ट्रवादी काँग्रेसने बढती दिली आहे. ते टोकवाडी येथील रहिवाशी आहेत..परळी पंचायत समिती मध्ये राष्ट्रवादीचे बहुमत आहे.
या विशेष सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सात सदस्य उपस्थित होते. भाजपचे तीन सदस्य यावेळी उपस्थित नव्हते. नूतन सभापती बालाजी मुंडे यांचे धनंजय मुंडेंचे यांच्या जगमीत्र कार्यालयामध्ये बीड जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे व तसेच परळी नप गटनेते वाल्मिक कराड यांनी स्वागत केले.