राष्ट्रवादीचे विटेकर गेले विधानसभेत, त्यांच्या बदल्यात योगेश क्षीरसागर जाणार विधानपरिषदेत?
By सोमनाथ खताळ | Published: November 27, 2024 12:51 PM2024-11-27T12:51:29+5:302024-11-27T12:57:37+5:30
मुंबईत फिल्डिंग, मराठवाड्याचाच राहणार विधानपरिषद सदस्य
बीड : विधानसभा निवडणुकीत पाथरी मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांचा विजय झाला. त्यामुळे त्यांची विधान परिषदेची जागा रिकामी झाली आहे. आता त्या जागेवर बीडचे डॉ. योगेश क्षीरसागर यांची वर्णी लागणार असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात मुंबईत चर्चाही झाली असून, फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे. ही जागा मराठवाड्यातच राहावी, यासाठीही राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहेत.
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै २०२४ रोजी निवडणूक होऊन निकाल लागला होता. यामध्ये मराठवाड्यातून परळीच्या भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि पाथरीचेअजित पवार गटाचे राजेश विटेकर यांना आमदारकी मिळाली होती. त्यानंतर विटेकर हे लगेच विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरले. त्यांनी काँग्रेसचे सुरेश वरपुडकर यांचा पराभव केला. त्यामुळे विटेकर यांची जागा रिकामी झाली.
दुसऱ्या बाजूला बीड मतदारसंघातून अवघ्या ५ हजार मतांनी निसटता पराभव झालेले अजित पवार गटाचे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी मुंबईत जाऊन अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी धनंजय मुंडे, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे आदींची उपस्थिती होती. या ठिकाणी पराभूत झाला असला तरी आमदार म्हणून काम करा, अशा सूचना डॉ. योगेश यांना देण्यात आल्या. तसेच पाथरीच्या जागा पुन्हा मराठवाड्यातच ठेवण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून विचार केला जात आहे. सर्वांत आघाडीवर डॉ. योगेश क्षीरसागर यांचे नाव असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे विधानसभेची उमेदवारी हुकलेले डॉ. योगेश यांना विधान परिषदेची आमदारकी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मंत्रिमंडळ स्थापन झाल्यावर यावर निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.
मुंडे बहीण-भाऊ धरणार आग्रह
बीडमधून डॉ. योगेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळावी, म्हणून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे आणि भाजपच्या पंकजा मुंडे यांनी महायुतीकडे आग्रह धरला होता. त्यानंतर प्रचारातही त्यांनी जोर दिला होता. परंतु, डॉ. योगेश यांचा निसटता पराभव केला. आता त्यांचे पुनर्वसन करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. मुंडे बहीण-भावाकडून डॉ. योगेश यांना विधान परिषद सदस्य करण्यासाठी महायुतीकडे आग्रह धरला जाण्याची शक्यता आहे.
पक्षश्रेष्ठींच्या भेटीला मुंडेंसोबत योगेश क्षीरसागर
विधानसभेचा निकाल लागताच परळीचे धनंजय मुंडे हे अजित पवार, सुनिल तटकरे यांच्या भेटीसाठी मुंबईला गेले. त्यांनी सर्वांचे स्वागत केले. विशेष म्हणजे यावेळी बीडचे डॉ.योगेश क्षीरसागरही त्यांच्यासोबत होते. पराभव झाला तरी धनंजय मुंडे यांच्याकडून डॉ.योगेश यांना बळ दिले जात असल्याचे यावरून दिसून येत आहे. यावर योगेश क्षीरसागर यांनीही यशाचे स्वागत आणि उमेदवारी आणि सहकार्याबद्दल आभार व्यक्त करायला गेल्याची भावना सोशल मिडीयावर व्यक्त केली आहे. परंतू या भेटीत काय चर्चा झाली, हे समजले नाही.
पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील
विधानसभेत निसटता पराभव झाला, हे मान्य आहे. आगामी काळात यात सुधारणा केल्या जातील. विधान परिषद सदस्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. मी यावर काहीच बोलणार नाही. परंतु, पक्ष जी संधी देईल, त्याचे सोने करण्यासाठी मी तत्पर असेल.
- डॉ. योगेश क्षीरसागर, बीड