माजलगाव (बीड) : माजलगाव तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि माजलगाव धरणात ३ टीएमसी पाणी सोडावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज परभणी फाटा येथे रस्तारोको आंदोलन करण्यात आले. यामुळे सुमारे दोन तास वाहतूक खोळंबली होती.
यावर्षी माजलगाव तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मुग, तूर, उडीद, बाजरी, आदी पिके धोक्यात आली असून यामुळे शेतकऱ्यावर अस्मानी संकट ओढावले आहे , भविष्यात पिण्याचा पाण्याचा तसेच गुरा ढोरांच्या चारच्या देखील गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे माजलगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा. खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानी संदर्भात हेक्टरी 50000 रुपये नुकसान भरपाई द्यावी, गेल्या वर्षीचे बोंडअळीचे अनुदान तातडीने वाटप करावे, शेतीपंपाची लोडशेडींग बंद करावी. गेल्या वर्षीच्या खरीपच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी ऑनलाईन भरलेल्या पिक विमा ची रक्कम खात्यावर तातडीने भरावी. भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या उपाय योजना कराव्यात यासह अनेक मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने रस्तारोको आंदोलन येथील परभणी फाट्यावर करण्यात आले.
दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे परभणी फाटा येथे येणाऱ्या तिन्ही रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. आंदोलकांनी तहसीलदार एन.जी. झम्पलवाड यांना निवेदन दिले. आंदोलनात बाजार समिती सभापती अशोक डाक, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे मराठवाडा सरचिटणीस जयसिंग सोळंके, दीपक जाधव , जयदत्त नरवडे, नीलकंठ भोसले, वसीम मनसबदार, बाळासाहेब जाधव, चंद्रकांत शेजुळ, दयानंद स्वामी, मनोज फरके , प्रा. प्रकाश गवते, कल्याण आबुज, शरद चव्हाण,महिवाल लांडगे , विश्वंभर थावरे आदींची उपस्थिती होती.
माजलगाव धरणात ३ टीएमसी पाणी सोडा यावेळी माजीमंत्री प्रकाश सोळंके यांनी नगर नाशिक मधील धरणातून जायाकावाडीला १३ टीएमसी पाणी सोडून त्यातील ३ टीएमसी पाणी माजलगाव धरणात सोडण्याची मागणी केली. यासोबतच चुकीच्या आणेवारीमुळे माजलगाव तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आला आहे याची किंमत सरकारला मोजावी लागेल, पाण्याच्या प्रश्न लवकर निकालात काढावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सोळंके यांनी दिला.