दिंद्रुड : पीककर्ज मिळत नसल्याची तक्रार करीत परळी तालुक्यातील मोहा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत व्यवस्थापकाच्या टेबलावर दगड ठेवून हार घालून, गुलाल वाहून गुरुवारी दुपारी आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. यावेळी व्यवस्थापकाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
सध्या पाऊसमान चांगले झाले असून मशागतीसाठी शेतकऱ्यांना पीककर्जाची आवश्यकता आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक मोहा (कान्नापूर) येथील व्यवस्थापक हे एजंट सांगेल त्याला कर्ज वाटप करीत असल्याची शेतकऱ्यांमध्ये ओरड सुरू होती. या संदर्भात मागील काही दिवसांपासून येथील व्यवस्थापकांकडे तत्काळ पीककर्ज वाटप करण्याची मागणी करूनही शेतकऱ्यांना पीककर्जापासून वंचित राहावे लागत होते. त्यामुळे जिल्हा परिषदेचे सभापती जयसिंह सोळंके समर्थकांनी गुरुवारी महाराष्ट्र ग्रामीण बँकेत घोषणाबाजी करीत व्यवस्थापकाच्या टेबलवर भलामोठा दगड ठेवला. नंतर त्याला हार घालून गुलाल टाकला. पीककर्ज तत्काळ वाटप करण्याची मागणी प्रशासनाकडे केल्याची माहिती जैतापूरचे उपसरपंच भागवत दराडे, हिंगणीचे उपसरपंच योगेश सोळंके यांनी ‘लोकमत’ला दिली. याप्रसंगी रणजित रूपनर, विशाल सोळंके, पप्पू सोळंके, प्रकाश सोनवणे उपस्थित होते. दरम्यान, या संदर्भात महाराष्ट्र ग्रामीण बँक, मोहा येथील शाखा व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.