-------------------------------------------
मोबाइल सेवा सुरळीत करण्याची मागणी
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण परिसरात दूरसंचारची सेवा सातत्याने विस्कळीत होत आहे. इंटरनेट सेवा सतत खंडित होत असल्याने अनेक शासकीय व निमशासकीय यंत्रणा ठप्प होतात. त्यामुळे ग्राहकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विस्कळीत सेवा सुरळीत करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शशांक दामोशन यांनी केली आहे.
--------------------------------
रस्ते डांबरीकरणाविना
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात अनेक रस्त्यांची मोठी दुर्दशा झालेली आहे, तर अनेक गावांमधील गावांना जोडणारे रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. यावर्षी झालेल्या पावसात अनेक रस्ते खचून गेले आहेत. मात्र, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे या रस्त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामीण भागातून संताप व्यक्त होत आहे.
---------------------------
ग्रामीण भागात चोऱ्या वाढल्या
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात सध्या शेतातील उसाला पाणी देणे सुरू आहे. मांजरा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीला पाणी सोडण्यात आले होते. विद्युत पंप चालवण्यासाठी ठिकठिकाणी केबल अंथरण्यात आले होते. या केबलची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे.
---------------------------
रस्त्यांची दुरवस्था वाढली
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात नवीन रस्ते मोठ्या प्रमाणात झाले आहेत, तसेच कॉलनीमध्येही रस्ते झालेले आहेत. शहरात सध्या बांधकामे जोरदार सुरू आहेत. यात अवजड वाहने, वाळू, विटांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर हाेत असल्याने रस्ते खचत आहेत.
------------------------