बीड : ‘२६ लाख नागरिकांच्या सुरक्षेचा भार १,२९७ पोलीस कर्मचाऱ्यांवर’ असे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी प्रसिद्ध केले होते. त्याचा आधार घेत जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी पत्राद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
जिल्ह्यात २८ पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ही २१९७ इतकी आहे. मात्र, जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास २६ लाख १० हजार इतकी आहे. दरम्यान, यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. कर्मचाऱ्यांची असलेली कमी संख्या व जिल्ह्यातील गुन्हेगारी यातदेखील तफावत आहे. चोरी, घरफोडी, दुखापत करणे, दरोडे, अत्याचार अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातही वाढ होत असल्याचा उल्लेख आ. नमिता मुंदडा यांनी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी. तसेच गस्तीसाठी नवीन वाहने व तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आ. मुंदडा यांनी गृहमंत्री, राज्यमंत्री व गृहविभाग मुख्य सचिव व प्रधान सचिव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.