तज्ज्ञांचा सल्ला : नियमित योगासनांची आवश्यकता
अंबाजोगाई : कोरोनानंतर संपूर्ण जगच बदलून गेले आहे. कोरोना संसर्ग झाला तरी फारसे घाबरण्याचे कारण नसले तरी आजकाल प्रत्येकजण कोरोना होऊच नये, यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविताना आहारात मूग, मटकी आदी कडधान्ये, ताज्या भाज्या, फळे, मांसाहार, दूध, हळदीचा वापर करत आहे. शरीर निरोगी राहण्यासाठी पोषक आहार आवश्यक आहेच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नेमके काय खावे, म्हणजे कोरोनाच होणार नाही, हा प्रश्न सर्वांनाच पडत आहे. मात्र, शरीर निरोगी राहण्यासाठी पोषक आहारासोबतच शरीराला दररोज व्यायामाचीही गरज आहे. दररोज दूध, हळद, फळे आहारात असणेही खूप गरजेचे असल्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञ, योगतज्ज्ञ नागरिकांना देत आहेत. कोरोनामुळे अनेकांनी बाहेरील खाद्यपदार्थ खाणे कमी केले आहे. मात्र, एरव्ही अनेक जण फास्ट फूड आवडीने खात होते. आता मात्र एकीकडे कोरोनाची भीती, तर दुसरीकडे आरोग्यावर फास्ट फूडचा होणारा परिणाम, यामुळे सध्या फास्ट फूडवर अघोषित बंदीच असल्याचे चित्र दिसून येत आहे. फास्ट फूडमुळे आरोग्यावरही विपरित परिणाम होत असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगत आहेत. पिष्टमय, नत्रयुक्त, चरबीयुक्त, क्षार, जीवनसत्त्वे व पाणी हे घटक आहेत. त्यापैकी क्षार व जीवनसत्त्वे आपल्याला ताज्या भाज्यांमधून मिळतात. आपल्या शरीराच्या वाढीसाठी क्षार व जीवनसत्त्वे गरजेची आहेत. अंडी खाणे, दूध पिणे आपल्या हाडांसाठी फायदेशीर असते. यामुळे आपली हाडे मजबूत होतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. दुधामुळे पचन होण्यास मदत होते. अशी मिळू शकतात जीवनसत्त्वे... प्रथिनांच्या पचनासाठी ‘अ जीवनसत्त्व, कर्बोदकांच्या पचनासाठी ‘ब’ जीवनसत्त्व, तर स्निग्ध पदार्थांच्या पचनासाठी ‘ई’ जीवनसत्त्वाची गरज असते. हाडांच्या बळकटीसाठी ‘ड’ जीवनसत्त्व, रक्तासाठी ‘क’ जीवनसत्त्व आपल्याला आहारातून मिळणे गरजेचे असते. या सर्व जीवनसत्त्वांची गरज आपणास विविध पालेभाज्या आणि कडधान्यांतून भागवता येते.