गुटखाबंदी असतानाही सर्रास विक्री सुरूच
माजलगाव : राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी आणली असली तरी शहरामध्ये अगदी सहजरीत्या गुटखा उपलब्ध होतो. दुप्पट भावाने त्याची विक्री केली जात आहे. अन्न व औषध प्रशासन, पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. कारवाईची मागणी आहे; परंतु याकडे संबंधित खात्याचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.
रस्त्यावरील अडथळ्यांचा वाहतुकीला त्रास
गेवराई : शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजुने अतिक्रमण, छोटी दुकाने असल्याने तसेच रस्त्यापर्यंत विक्रेते हातगाडे उभे करीत असल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. यातच या रस्त्यावर मोठी वाहने उभी केली जातात. वाहतूक सुरळीत करण्याची मागणी आहे.
रॉकेलचा गैरवापर सुरू
माजलगाव : गोरगरिबांसाठी रेशन दुकानावर आलेले रॉकेल काळ्या बाजारात जात असून, त्याचा वापर वाहनाचे इंधन म्हणून केला जात आहे. यामुळे प्रदूषण वाढत आहे. पुरवठा खात्याचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे रेशनकार्डधारकांना रॉकेल मिळेनासे झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
‘त्या’ वाहनधारकांवर कारवाईची मागणी
माजलगाव : येथील तालुका रुग्णालय परिसरात वाहनचालक कर्णकर्कश हॉर्न वाजवीत असल्याने रुग्णांसह सर्वसामान्यांना त्याचा त्रास होत आहे. अनेकवेळा वाहनधारक नागरिकांच्या जवळ येऊन मोठे हॉर्न वाजवत असल्याने नागरिक मोठ्या आवाजाने दचकत आहेत. या वाहनचालकांवर कारवाईची मागणी आहे.
वीज सुरळीत मिळेना
बीड : वडवणी तालुक्यातील चिंचोटी, साळिंबा, कुप्पा, देवडी, चिंचाळा, उपळी आदी गावांतील वीजपुरवठा सुरळीत सुरू नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तासन्तास वीज गायब राहत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप आहे. महावितरणने योग्य कारवाई करण्याची मागणी होत आहे.
बाजारतळ स्वच्छ करा
बीड : तालुक्यातील चौसाळा येथील बाजारतळ, तसेच बाजारपेठेत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीकडे स्वच्छतेची मागणी करून देखील स्वच्छता केली जात नाही. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे.