निवाऱ्यांची दुरवस्था; दुरुस्तीची मागणी
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रवासी निवारे आहेत. यावर्षी झालेल्या वादळी पावसाने प्रवासी निवाऱ्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अनेक प्रवासी निवाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत उगवल्याने, तर अनेक ठिकाणचे बसण्यासाठीचे ओटे फुटल्याने प्रवासी जनतेसाठी ते निकामी ठरले आहेत. दुरुस्तीची मागणी होत आहे.
स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज
बीड : शहरातील प्रमुख मार्गावरच न.प.च्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य साचले आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात पुन्हा स्वच्छता अभियान राबवून त्यामध्ये सातत्य ठेवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
उघड्या रोहित्रांमुळे अपघाताचा धोका
बीड : तालुक्यातील चौसाळा येथील मोंढा परिसरात असलेले विद्युत रोहित्र उघडे असून, त्याचे फ्यूज फुटलेले आहे. तुटक्या फ्यूजआधारे वीजपुरवठा सुरू आहे. रोहित्र उघडे असल्याने या परिसरात अपघात होण्याचा धोका नाकारता येत नाही. महावितरणच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीने नवे फ्यूज बसवण्याची मागणी होत आहे.
नदीत झुडपे वाढल्याने पात्र अरुंद
चौसाळा : बीड तालुक्यातील कुंभारी, सात्रापोत्रा, पालसिंगण या गावांतून वाहणाऱ्या गणेश नदीपात्रात झाडाझुडपांची संख्या वाढली आहे. तसेच वाळू उपशामुळे नदीचे पात्र अरुंद झाले असून, ओढ्यासारखे दिसत आहे. यामुळे नदीतील झाडे काढून स्वच्छतेची मागणी होत आहे.
रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा
माजलगाव : तालुक्यातील जायकोचीवाडी या गावचा रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून रखडलेला आहे. जायकोचीवाडी ते खामगाव पंढरपूर डांबरी रस्ता व पाणंद रस्ता अत्यंत बिकट झालेला आहे. या रस्त्याच्या समस्येबाबत निवेदनही दिले आहे. रस्त्याचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
पेट्रोल दरवाढीमुळे वाहनचालकांना त्रास
बीड : पेट्रोल व डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहनचालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीमुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले असून पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी नागरिक, वाहनधारकांमधून होत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे महागाईत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनमानावर होत आहे.
जनजागृती मोहिमेची आवश्यकता
बीड : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे व नागरिकांनी दक्षता बाळगावी यासाठी आरोग्य प्रशासन व जिल्हा प्रशासन यांच्या वतीने जनजागृती मोहीम सुरू आहे. मास्कचा वापर करण्याबद्दल सक्ती केली जात आहे. शहरवासीयांनी बाजारात मास्क खरेदीसाठी सुरुवात केली आहे. ग्राहकांची मास्क खरेदीसाठी असलेली मोठी पसंती यामुळे बाजारात फॅन्सी मास्क मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले आहेत. अनेक दुकानदार मास्क चढ्या भावाने विकत आहेत.