Ajit Pawar in Beed: उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार हे दुसऱ्यांदा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यापूर्वी अजित पवार हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीडमध्ये आले होते. त्यानंतर आता बीडमधल्या गुन्हेगारीच्या बातम्या सातत्याने चर्चेत असताना अजित पवार बीडमध्ये दाखल झाले आहेत. बीडमध्ये पाऊल ठेवताच पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. योग्य माहिती उपलब्ध नाही असं चालणार नसल्याचे अजित पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी आठच्या सुमारास हेलिकॉप्टरने बीडमध्ये दाखल झाले. यावेळी अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. हेलिकॉप्टरमधून उतरताच अजित पवार यांनी अधिकाऱ्यांकडून स्वागत स्विकारुन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याशी संवाद साधला आणि ते गाडीकडे निघाले. त्यानंतर पुन्हा ते मागे फिरले आणि त्यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना केल्या. बीडमधील विमानतळ, रेल्वे लाईन, घरकुल, जिल्हा बँक निधी या संदर्भातील सविस्तर माहिती देण्यास अजित पवार यांनी सांगितले.
"पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आयुक्त त्या सगळ्यांना एकत्र घेऊन या. आम्ही आता येताना चर्चा केली आहे. मला काय काय माहिती पाहिजे. तुमच्या दुपारपासून मिटिंग आहेत. मिटिंगमध्ये बोलायला मी सुरुवात केल्यानंतर याची माहिती नाही त्याची माहिती नाही असं चालणार नाही. तुम्हाला चार तास मिळत आहेत त्यामध्ये सगळी माहिती मला पाहिजे. मी मुद्दे दिले आहेत त्यांची माहिती हवी आहे. पुढच्या वेळी आल्यानंतर मी बैठक आधीच घेणार आहे. डिसेंबर पर्यंत आपल्याला हे मार्गी लावायचे आहे. शेवटच्या क्षणापर्यंत हे चालणार नाही," असं अजित पवार म्हणाले.
अजित पवारांच्या दौऱ्यात धनंजय मुंडे यांची गैरहजेरी अजित पवारांच्या दौऱ्यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित नसणार आहेत. मंत्रीपदाची राजीनामा दिल्यापासून धनंजय मुंडे हे सक्रिय नाहीत. त्यानंतर अजित पवारांच्या बीड दौऱ्यावेळी धनंजय मुंडे उपस्थित राहणार होते. मात्र आता धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्यासोबत उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांनी एक्स पोस्टवरुन ही माहिती दिली.
"उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या आजच्या बीडमधील नियोजित दौऱ्यात मी पूर्णवेळ उपस्थित राहणार होतो. परंतु, माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावे लागले आहे. त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही," असं धनजंय मुंडे म्हणाले.