कडा : आष्टी तालुक्यातील सांगवी(पा) येथे तीन वर्षांपूर्वी दलित वस्ती विकास योजनेंतर्गत समाजमंदिर इमारतीच्या बांधकामासाठी सात लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यानंतर ज्या ठिकाणी नवीन इमारत बांधायची आहे. तेथील जुनी इमारत जमीनदोस्त करण्यात आली व नवीन इमारतीच्या बांधकामाचा नारळ वाढविण्यात आला. अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाल्याचे समाधान सर्व ग्रामस्थांमध्ये होते. मात्र हे समाधान जास्त काळ टिकले नाही. आजतागायत जवळ-जवळ तीन-चार वर्षे होत आली असून, हे काम पूर्णपणे रखडले आहे. येथील ग्रामस्थांना पूर्वीची इमारत पाडल्याने आणि नवीन इमारत होत नसल्याने त्यांचे धार्मिक, सामाजिक कार्यक्रमासाठी गैरसोय होत आहे. राजकीय वादात नाहक समाजाचा बळी चालला आहे, असे ग्रामस्थांतून बोलले जाते. गावातील इतर सर्व विकासकामे सुरळीतपणे पार पडत आहे, मात्र दलित वस्तीच्या सभागृहाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सर्वच पक्ष संघटनांचा एकही पुढारी या कामाची दखल घेत नसल्याने जायचे कोणाकडे हा प्रश्न आहे. हे काम लवकरात लवकर संबंधित प्रशासकीय यंत्रणा आणि संबंधित ठेकेदारांनी करून द्यावे अन्यथा संबंधित शासकीय यंत्रणेच्या कार्यालयापुढे उपोषणाला बसण्याचा इशारा येथील अजय बोराडे, दत्तू खंडागळे, सुनील खंडागळे, लक्ष्मण खंडागळे, राजू खंडागळे, तुषार खंडागळे यांनी दिला आहे.
तीन वर्षांपासून बौद्धवस्ती सभागृह बांधकामाकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 4:28 AM