बीड : एटीएम कार्ड क्लोनिंग करून लाखोंचा गंडा घालणाऱ्या बिहारच्या गुन्हेगारांना ९ फेब्रुवारी रोजी बीड पोलिसांच्या सायबर विभागाने जेरबंद केले. यामुळे एटीएम कार्ड क्लोनिंग करण्यात आल्याचे उघड झाल्यानंतरही जिल्ह्यातील एटीएमच्या सुरक्षेबाबत काही बँकांचा हलगर्जीपणा दिसून येत आहे.
ऑनलाइन व्यवहार पद्धतीचा गैरफायदा, एटीएम कार्ड क्लोनिंग करून किंवा ओटीपीच्या माध्यमातून बँक खात्यातील रक्कम लंपास करणाऱ्या परराज्यातील टोळ्या सक्रिय आहेत. फोन पे किंवा गुगल पे या कंपनीचे कस्टमर केअर बोलतोय, असा संवाद साधून मोबाइलवर आलेला ओटीपी विचारून खात्यातील पैसे लंपास केल्याचे गुन्हेही विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत. या प्रकरणांचा तपास करण्यास अनेक अडचणी स्थानिक पोलिसांना येतात. बीड पोलिसांच्या सायबर विभागाने बीड शहरात क्लोनिंग करून खात्यातील पैसे लाटणाऱ्या ५ जणांना ताब्यात घेतले आहे. शहरातील स्वराज्यनगर भागात असलेल्या एटीएम मशीनला क्लोनिंगचे डिव्हाइस लावून या भामट्यांनी पैसे हडप केले होते. हे उघड झाले होते. मात्र, त्यानंतरही शहरातील बहुतांश एटीएमच्या बाहेर सुरक्षारक्षक नसल्याचे चित्र आहे. तेथील सीसीटीव्हीही नादुरुस्त आहेत. अनेक एटीएममध्ये अस्वच्छता आहे. त्यामुळे बँकांनी तत्काळ सर्व एटीएमवर सुरक्षारक्षकाची नेमणूक करून एटीएम सुरक्षित करावे, अशी मागणी होत आहे.
‘एटीएम’मधील तिन्ही डोळे गायब
एटीएम सुस्थितीत राहण्यासाठी त्या ठिकाणचे तापमान योग्य राहण्यासाठी एसीची गरज असते, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही असणे गजेचे आहे. मात्र, अनेक एटीएममध्ये एसी, सीसीटीव्ही बंद अवस्थेत आहेत, तसेच सुरक्षारक्षकही त्या ठिकाणी नसल्यामुळे सुरक्षेचे तिन्ही पर्याय नसल्याचा गैरफायदा भामटे घेतात व याचा मन:स्ताप सर्वसान्य नागरिकांना सहन करावा लागतो.
एटीएम वापरताना ही घ्या काळजी
बँकेत जमा असलेली रोख रक्कम काढण्यासाठी एटीएमचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या माध्यमातून होणाऱ्या गुन्ह्याची संख्याही वाढत आहे. त्यामुळे कायम गर्दीच्या ठिकाणी एटीएमचा वापर करणे टाळावे, पैसे काढताना जवळ अनोळखी कोणी नाही, याची खात्री करावी. पैसे निघाल्यानंतर मिळणारी पावती कुठेही फेकू नका, त्याचा गैरवापर होऊ शकतो. व्यवहार पूर्ण झाल्यावर नेहमी कॅन्सल बटन दाबा, सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक असलेल्या एटीएमचाच वापर करा, मोबाइलवर संदेश येऊनही पैसे न मिळाल्यास बँकेकडे तक्रार करा, ही काळजी घेतल्यास एटीएमच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळता येईल, तसेच ऑनलाइन ॲप किंवा बँक तुमचा पिन नंबर, पासवर्ड कधीही विचारत नाही. त्यामुळे तो कोणालाही सांगू नका.
नागरिकांनी वेळीच तक्रार करावी
क्लोनिंग झाल्यानंतर बँक खात्यातून रक्कम काढल्याचा संदेश मोबाइलवर आला, तर तत्काळ बँकेशी संपर्क करा, ते कार्ड बंद केले जाईल, तसेच त्या संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल करावा. तो प्रकार क्लोनिंगचा असल्याचे सिद्ध झाल्यास बँकेकडून त्या रकमेचा परतावा मिळतो. मात्र, सर्व बँकेच्या एटीएमवर सुरक्षारक्षक नेमलेले असतात, तसेच सीसीटीव्हीही सुरू असतात. मात्र, ते त्या ठिकाणी नसतील, तर नागरिकांनी संबंधित बँकेकडे तक्रार करावी, आम्हीही सर्व बँकांना सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनेच्या सूचना देऊ. नागरिकांनी व्यवहार करताना काळजी घ्यावी, असे आवाहन अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्रीधर कदम यांनी केले आहे.