बीड : ग्राहक जरी मास्क वापरत असले तरी अनेक फळ व भाजीविक्रेते अद्यापही मास्कचा वापर टाळत आहेत. बीड शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अशास्थितीत या विक्रेत्यांना मास्क वापरणे सक्तीचे करावे अन्यथा प्रादुर्भाव वाढीस लागेल, अशी भीती निर्माण झाली आहे.
वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची हानी
पाटोदा : पाटोदा शहर व तालुका परिसरात वन विभागाची मोठी झाडी आहे. या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सरपणासाठी लोक झाडांचे फाटे तोडून नेत आहेत. याकडे स्थानिक प्रशासन व वन विभागाचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. यामुळे पर्यावरणाची हानी होऊ लागली आहे.
उन्हाची तीव्रता वाढली
बीड : तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. त्यामुळे दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. सकाळी १० वाजल्यापासून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. सायंकाळपर्यंत उन्हाची तीव्रता कायम राहात आहे. वाढत्या उन्हामुळे थंडपेयांना मागणी असून, उन्हापासून संरक्षण करणाऱ्या टोप्यांची विक्री सुरू झाली आहे.
सुधारित वेतनाची प्रतीक्षा
अंबाजोगाई : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची सुधारित वेतनवाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हा निर्णय घेऊन बराच कालावधी लोटला, तरी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याबाबतच्या निर्णयाची अद्याप शासनाने अंमलबजावणी केलेली नाही. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना हे सुधारित वेतन लागू करावे व त्यांच्यावरील अन्याय दूर करावा, अशी मागणी होत आहे.
घरकुल लाभार्थी अनुदानापासून वंचित
अंबाजोगाई : दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या लाभार्थींना हक्काचे घर मिळावे, यासाठी शासनातर्फे विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत. तालुक्यातील मुडेगाव, राडी, दैठणा, आपेगाव, राडीतांडा, तडोळा या परिसरातील अनेक लाभार्थींना अजूनही अनुदान मिळाले नाही. या परिसरातील लाभार्थ्यांना अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक कदम यांनी केली आहे.
शहरातील बँकांमध्ये गर्दी कायम
बीड : शहरात राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांची संख्या मोठी आहे. शहरातील बँकांमध्ये पैसे भरणे, पैसे काढणे व विविध बँकेच्या कामकाजासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बँक प्रशासनाकडून कुठल्याही ठोस उपाययोजना आखल्या जात नाहीत. याशिवाय बँकेत कोरोनाविषयी अत्यावश्यक असणारे सॅनिटायझर व सामाजिक अंतराचा वापर याकडे दुर्लक्ष होत आहे. या दुर्लक्षामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.