संजीवनी बालासाहेब सातपुते (रा. सातपुते वस्ती, येल्डा, ता. अंबाजोगाई) याच्या फिर्यादीनुसार त्यांच्या कुटुंबीयांनी साडेतीन एकर शेतीची इसार पावती केली आहे. शेतजमीन खरेदीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्यांनी ५ लाख १० हजार रुपये आणून घरातील पेटीत ठेवले होते. या पेटीतच घरातील महिलांचे दागिनेही होते. बुधवारी रात्री सर्व कुटुंबीय जेवण करून झोपी गेले. गुरुवारी पहाटे १ वाजताच्या सुमारास पत्रे वाजल्याचा आवाज आल्याने संजीवनीबाईंना जाग आली असता एका व्यक्तीने पत्र्यावरून उडी मारून येत त्यांच्या डोक्यात दगड मारून मारहाण केली. या झटापटीत त्या व्यक्तीच्या तोंडावर बांधलेले फडके निघाले तेव्हा तो शेजारी राहणारा गणेश ब्रह्मदेव सातपुते असल्याचे संजीवनीबाईंच्या लक्षात आले. त्यानंतर गणेशने रोख ५ लाख १० हजार आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ६ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल असलेली पेटी उचलून पत्र्यावर थांबलेल्या अनोळखी सोबत्याच्या हातात दिली. दरम्यान, संजीवनी यांचे पती बालासाहेब यांनी गणेशला अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही दगडाने मारहाण केली आणि दोघेही पसार झाले, असे फिर्यादीत नमूद आहे. सदर फिर्यादीवरून दोन्ही आरोपींवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला.
तोंडाला फडके बांधून आला शेजारी; केली सव्वासहा लाखांच्या मुद्देमालाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 4:46 AM