नांदूरघाट : केज तालुक्यातील एका खेड्यात मामी गायब झाल्यानंतर भाचाही २१ सप्टेंबर रोजी बेपत्ता असल्याचे समोर आले. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, केज तालुक्यातील एका गावात ३६ वर्षीय महिला १८ सप्टेंबर रोजी घरातून बेपत्ता झाली. तिला १० वर्षांचा मुलगा व १२ वर्षांची मुलगी आहे. दरम्यान, कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊनही ती सापडली नाही.
बेपत्ता विवाहितेचा पती वाहनचालक असून, त्याने आठ दिवसांपूर्वी कारखान्याकडून दीड लाख रुपये उचल घेतली होती. ही रोकड व दागिनेही गायब असल्याचे निदर्शनास आले. यावरून २० रोजी केज ठाण्यात बेपत्ताची तक्रार नोंदविण्यात आली. तपास जमादार जयवंत शेप यांच्याकडे सोपविण्यात आला. दरम्यान, बेपत्ता महिलेचा भाचाही गायब असल्याचे समोर आले. पत्नीला २५ वर्षीय भाच्यानेच पळविल्याचा आरोप बेपत्ता महिलेच्या पतीने केला आहे. तो अविवाहित असून १८ रोजी गावात आल्याचे काही जणांनी पाहिले होते. त्याचा मोबाइल बंद असून तो बेपत्ता आहे. त्यामुळे या बाबीला पुष्टी मिळाली असून आता दोघांचाही शोध सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.