माजलगाव (बीड): सख्ख्या मामीवर भाच्याने डोळा ठेवला. प्रेमाचा मार्ग मोकळा करण्यासाठी दोघांच्या मदतीने मामाची सिनेस्टाइल हत्या केली. बीड- जालना जिल्ह्याच्या सीमेवरील रिधोरी (ता. माजलगाव) येथे बंधाऱ्याजवळ मामाच्या शरीराचे दोन तुकडे केले. त्यानंतर मृृतदेहाचे दोन तुकडे पोत्यात भरून वारोळा (ता. माजलगाव) शिवारातील एका विहिरीत फेकले. हा थरारपट १८ मे रोजी उघडकीस आला. शेलगावडथडीतील विहिरीत आढळलेल्या शरीराच्या दोन तुकड्यांतील कुजलेल्या मृतदेहाला तब्बल नऊ महिन्यांनी वाचा फुटली. पोलिसांनी भाचा, पुतण्यासह अन्य एकास बेड्या ठोकल्या आहेत.
डिगांबर हरिभाऊ गाडेकर (वय ३५, रा. बाभळगाव, ता. माजलगाव) असे मृताचे नाव आहे. ते संजय गांधी निराधार समितीच्या तालुका समितीचे माजी सदस्य होते. ३० सप्टेंबर २०२१ रोजी ते घरातून बेपत्ता झाले होते. १४ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यांचे बंधू नारायण हरिभाऊ गाडेकर यांच्या माहितीवरून दिंद्रूड ठाणे हद्दीत बेपत्ताची नोंद झाली. दरम्यान, ११ मे २०२२ रोजी वारोळा शिवारातील एका विहिरीत मानवी शरीराचा कंबरेखालील भाग आढळला. कुजलेल्या मृतदेहाच्या पँटच्या खिशातील कॅरीबॅगमध्ये वेगवेगळ्या महिलांचे पासपोर्ट फोटो आढळले. तीन दिवसांनी विहिरीच्या तळाला शिर व धड असलेला शरीराचा भागही आढळला. मृतदेहाचे दोन्ही तुकडे तपासणीसाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात पाठविले. माजलगाव ग्रामीण ठाण्याचे पो. ना. रवी राठोड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. बेपत्ता डिगांबर गाडेकर हे निराधार योजनेचा लाभ मिळवून देत. त्यामुळे हा मृतदेह त्यांचा असावा, असा पोलिसांचा कयास होता. पोलिसांनी संबंधित महिलांची ओळख पटवून विचारपूस केली तेव्हा योजनेच्या लाभासाठी नऊ महिन्यांपूर्वी डिगांबर यांना फोटो दिल्याची कबुली दिली. शिवाय त्यांचे बंधू नारायण यांनी मृत डिगांबर यांच्या डोक्याला बालपणीपासून छिद्र होते, असे सांगितले. कवटीची बारकाईने तपासणी केली तेव्हा तसे छिद्र आढळले. त्यावरून हा मृतदेह त्यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, ग्रामीण ठाण्याच्या प्रमुख व प्रशिक्षणार्थी आयपीएस रश्मिता एन. राव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विजयसिंह जोनवाल, उपनिरीक्षक सुनील बोडखे, पो. ना. रवी राठोड, यांच्या पथकाने सोपान सोमनाथ मोरे (२३, रा. उक्कडगाव, ता. घनसांगवी, जि. जालना), गणेश नारायण गाडेकर (२२, रा. बाभळगाव, ता. माजलगाव) व बाळासाहेब जनार्दन घोंगाणे (३१, रा. मोगरा, ता. माजलगाव) या तिघांना १८ रोजी अटक केली.
आरोपी कोठडीत, पत्नीही संशयाच्या फेऱ्याततिन्ही आरोपींना १९ रोजी माजलगाव न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पत्नीही संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे. तपासात अनेक बाबींचा खुलासा होईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
कुणकुण लागताच मामी-भाचा पसारदरम्यान, मृतदेह डिगांबर गाडेकर यांचा असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचल्याची कुणकुण लागल्यावर त्यांची पत्नी अनिता व भाचा सोपान सोमनाथ मोरे (रा. उक्कडगाव, ता. घनसांगवी, जि. जालना) हे दोघे ११ मे पासून फरार असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांचा या दोघांवर संशय बळावला. पोलिसांनी तांत्रिक तपास केला तेव्हा या दोघांचे फोनवर अनेकदा बोलणे सुरू असल्याचे उघड झाले.
पुतण्याचाही कटात सहभागभाचा-मामीचे मोबाईलवर सतत बोलणे सुरू होते, त्यांच्या प्रेमातील अडथळा दूर करण्यासाठी सोपान मोरे याने मामा दिगांबर यांचा पुतण्या गणेश नारायण गाडेकर (रा. बाभळगाव, ता. माजलगाव) व बाळासाहेब जनार्दन घोंगाणे (रा. मोगरा, ता. माजलगाव) यांना हाताशी धरले. ३० सप्टेंबर २०२१ रोजी डिगांबर गाडेकर यांना पळवून नेले व कुऱ्हाडीने शरीराचे दोन तुकडे करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती तपासात पुढे आल्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक सुनील बोडखे यांनी सांगितले.