कडा : सद्य:स्थितीमध्ये कष्ट करण्याकडे सर्वसामान्य शेतकरी बांधवांचे दुर्लक्ष आहे. तरुणाईसुद्धा शेतीकडे सातत्याने पाठ फिरविते, परंतु आष्टी तालुक्यातील वटणवाडी येथील महिला शेतकरी वंदना हनुमंत जाधव यांनी मोठी जोखीम घेत टरबूज आणि खरबूज पिकाच्या माध्यमातून तीन एकरांमध्ये घेतलेले लाखो रुपयांचे उत्पन्न या भागात प्रेरणादायी बाब समजली जात आहे.
अपार मेहनत कष्ट आणि परिश्रमाच्या घामातून अहोरात्र शेतीमध्ये राबराब राबून आपल्या अडीच एकर खरबूज शेतीमध्ये खरबुजाचे उत्पादन घेऊन लाख रुपये उत्पन्न काढण्याची किमया जिद्दीच्या प्रवासातून झाली आहे. आष्टी तालुक्यातील वटणवाडी हे ग्रामीण भागातले एक छोटेसे गाव. येथील बहुतेक जण शेतीवर आपली गुजराण करतात. विविध मार्गांनी पाण्याचा स्रोत वापरून विहीर बोर आणि शेततलावाच्या माध्यमातून येथील शेतकरी कष्टाच्या जोरावर शेतीतून उत्पादन घेतात. अशाच या कष्टकरी गावातील विशेष म्हणजे महिला शेतकरी असलेल्या वंदना हनुमंत जाधव यांनी आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन घेत खरबूज या रोपांची लागवड केली.
आपल्या मुलाबाळांप्रमाणे त्यांची वाढ करून जोपासना केली. वेळेवर खत बी-बियाणे आणि पाणी देऊन मशागत केली. जुन्याजाणत्या शेतकऱ्यांचे मार्गदर्शन तसेच कृषी अधिकारी यांच्या अथक मार्गदर्शनातून आधुनिक तंत्राद्वारे मोठमोठे टरबूज आणि खरबूज यांचे उत्पादन झाले. हे मोठे झालेले टरबूज आणि खरबूज त्यांनी मोठ्या बाजारपेठेमध्ये न नेता डायरेक्ट अहमदनगर-बीड या राज्य महामार्गावर तीन स्टॉल लावून थेट ग्राहकांच्या हातात हे टरबूज, खरबूज दिले जात आहे. अर्थातच कमी दराने ग्राहकांना टरबूज व खरबूज मिळतात. हा आगळावेगळा प्रयोग जाधव परिवाराने राबविला. यासाठी त्यांना खूप परिश्रम घ्यावे लागत आहेत, परंतु त्यांच्या जिद्द आणि मेहनतीच्या घामामुळे यांना दोन एकरामधील टरबूज आणि एक एकरातील खरबूज उत्पादनातून सहा लाख उत्पन्न मिळाले. यातील तीन लाख रुपये खर्च जाता तीन लाख रुपये त्यांना नफा राहिला. यात ते समाधानी आहेत.
पहिल्या वर्षीचा हा पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे. आपल्या घामाच्या पैशातून मिळालेल्या या उत्पन्नातून त्यांनी आपल्या मुलांना शिकवून एक वेगळा आदर्श या महिला शेतकऱ्यांनी केल्याबद्दल एक प्रेरणा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
राज्य महामार्गावर तीन स्टॉलच्या साहाय्याने खरबूज विक्रीला सुरुवात
आष्टी तालुक्यातील वटणवाडी येथील प्रयोगशील शेतकरी हनुमंत जाधव व वंदना जाधव यांनी आधुनिक व सेंद्रिय पद्धतीने मल्चिंग पेपरवर अडीच एकरवर खरबुजाची लागवड केली आहे. फळ विक्रीचा शुभारंभ माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे, उत्तम बोडखे, रघुनाथ कर्डीले यांच्या हस्ते करण्यात आला.