अंबाजोगाई : पीक पेरा नोंदणीसाठी डाऊनलोड करावयाच्या ॲपमध्ये नेटवर्कची आडकाठी आली आहे. त्यामुळे तलाठी, शेतकरी हैराण झाले आहेत. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
या ॲपच्या माध्यमातून शेतकरी सक्षमीकरणाच्या दृष्टीने शासनाने पाऊल उचलले आहे. तालुक्यात सुरुवातीला नोंदीही झाल्या. मात्र, सध्या मोबाईलवर नेटवर्क असतानाही ॲप ओपन होत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याबाबत काही अडचण आल्यास तलाठी आणि कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. हा कर्मचारी वर्गही तांत्रिक अडचणी सोडविण्यात सक्षम नाही.
या ॲपवर माहिती भरल्याशिवाय शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही, असे सांगण्यात आले. आता निर्माण झालेल्या अडचणीवर प्रशासनाच्यावतीने तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे. माहिती भरण्यासाठी मार्गदर्शन करणारे अनेकजण उपलब्ध होत आहेत. परंतु ॲपच डाऊनलोड होत नसल्याने तेही हतबल झाले आहेत. ॲपवर नोंदविलेल्या माहितीनुसारच मदत दिली जाणार असल्याने शेतकऱ्यांची याकरिता धडपड सुरू आहे. हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
ॲपने अडचणी वाढविल्या
ॲप डाऊनलोड होत नाही. अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे ही समस्या आहे, तर दुसरीकडे ॲपवर पीक पेरा नोंदविल्यावर मदत मिळणार नाही, असे सांगितले जात आहे. अशावेळी प्रशासनाने मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा शेतकरी अशोक कचरे यांनी व्यक्त केली आहे.