- सोमनाथ खताळ
बीड : जन्मल्यानंतर अवघ्या काही तासांत आता बाळाची आधार नोंदणी होणार आहे. महाराष्ट्रातील जिल्हा, उपजिल्हा, स्त्री व ग्रामीण अशा ४९० आरोग्य संस्थांमध्ये ही सुविधा एकाचवेळी उपलब्ध करून देण्यात आली असून १ जानेवारी २०२० पासून याची सुरूवात होणार आहे. सामान्यांच्या हितासाठी आरोग्य विभागाने एक आदर्श उपक्रम हाती पहिल्यांदाच घेतला आहे.
आधार नोंदणी करण्यासाठी हाताचे ठसे, डोळ्यांचे बाहुलींची प्रतिमा आणि ओळखपत्र अशी कागदपत्रे लागतात. मात्र, आरोग्य विभागाने आता बाळ जन्मल्यानंतर त्याला रुग्णालयातच आधार कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आरोग्य विभाग व भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण विभागाच्यावतीने चार दिवसांचे प्रशिक्षण दिले जात आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांतील प्रत्येक जिल्ह्यातील एका निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह दोन कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. हेच प्रशिक्षित कर्मचारी आपल्या जिल्ह्यात १७ डिसेंबर रोजी प्रत्येक आरोग्य संस्थेत नियूक्त केलेल्या एक परिचारीका व लिपीकवर्गिय कर्मचाऱ्याला माहिती देणार आहेत. यासाठी संबंधित जिल्ह्याच्या प्राधिकरण कार्यालयाची मदत घेतली जाणार असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. आधार कार्डसाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र, आता आरोग्य विभागाने पहिल्यांदाच अशी सुविधा उपलब्ध करून दिल्याने समाधान व्यक्त होत आहे.
प्रोत्साहन म्हणून २७ रूपये मानधनप्रत्येक आरोग्य संस्थेत परीक्षा घेऊन एक परिचारीका व लिपीकवर्गिय कर्मचारी आधार नोंदणीसाठी नियूक्त केला आहे. प्रत्येक एका नोंदणीला या कर्मचाऱ्यांना २७ रूपये मानधन दिले जाणार आहे. हे १०० रूपयांपर्यंत देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन आहे. त्यांना हे मानधन प्रोत्साहन म्हणून दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
फोटो आणि पालकांचे लागणार ओळखपत्रसंबंधित बाळाचे आधार कार्ड देताना त्यांच्यासोबत आई, वडील किंवा पालक म्हणून कर्तव्य बजावत असलेल्या व्यक्तीचे ओळखपत्र आवश्यक असणार आहे. तसेच बाळाचे फोटोद्वारे आधार संलग्न केले जाणार आहे. रुग्णालयातून सुटी होण्यापूर्वीच पालकांच्या हाती हे कार्ड दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले
१ जानेवारी २०२० पासून नवजात बालकांची जिल्हा, ग्रामीण, स्त्री व उपजिल्हा रुग्णालयात आधार नोंदणी करण्याचे आदेश आले आहेत. यासाठी आमच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. आता प्रत्येक आरोग्य संस्थेतील दोन कर्मचाऱ्यांना १७ डिसेंबरला प्रशिक्षण देणार आहोत. - डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड