बीड : जिल्ह्यातील विकासाच्या दृष्टीने विविध योजना राबविण्याच्या संदर्भात नवनिर्वाचित जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी सर्व अधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक घेतली. यावेळी रोजगार हमीसह इतर योजनांची कामे सुरू करण्यासंदर्भात सूचना दिल्या. तसेच नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या सोडविण्याच्या संदर्भात योग्य व तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
यावेळी सर्व विभागांचे उपजिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यात सुरू असलेल्या योजनांचा आढावा जिल्हाधिकारी जगताप यांनी घेतला. यामध्ये प्रामुख्याने कोरोना, राजोगार हमी योजना, गौण खनिज, भूसंपादन, राष्ट्रीय महामार्ग, महसूल वसुली, प्रलंबित कामांचा निपटारा यासह निराधारसह इतर योजनांचा समावेश या बैठकीत होता. जिल्ह्यातील जवळपास बंद झालेल्या रोजगार हमी योजनेची कामे पुन्हा सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच यामध्ये अनियमितता होणार नाही तसेच मजुरांना मजुरी वेळेवर मिळेल, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करावी, असेही बैठकीत सांगण्यात आले. दरम्यान, गौण खनिजच्या संदर्भात चोरट्या पद्धतीने होणारी वाळू वाहतूक रोखण्यासाठी कारवाई करण्यात यावी, नागरिकांची कामे करताना सर्व अधिकाऱ्यांनी विषय समजून घ्यावा, अभ्यास करून योजना राबवाव्यात जेणेकरून नागरिकांना याचा फायदा होईल, अशा सूचना जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी यावेळी दिल्या.
दर महिन्याला होणार बैठक
प्रलंबित कामांचा निपटारा करण्यात यावा तसेच योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. दरम्यान, जिल्हाधिकारी यापुढे केलेल्या कामाचा आढावा प्रत्येक महिन्याला घेणार आहेत.
प्रतिक्रिया
सुरू असलेल्या योजनेच्या संदर्भात आढावा बैठक घेतली. यामध्ये कोरोना, रोजगार हमी योजना यासह इतर विषयांचा आढावा घेतला. तसेच नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने लवकरात लवकर सुरू करता येणारी कामे तत्काळ सुरू करावीत असे निर्देश दिले आहेत.
रवींद्र जगताप, जिल्हाधिकारी बीड