बीड : न्यायालयाच्या आदेशानंतर बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची बदली करण्यात आली. या रिक्त जागी हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. १२ ऑगस्टला त्यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला असून, जगताप यांना निरोप देण्यात आला.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण आलेला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार, तसेच आरोग्य विभागासोबत मिळून रुग्णांना चांगल्या व प्रभावी सुविधा मिळतील यासाठी प्रयत्न केले होते. तसेच ऑक्सिजनचा तुटवडा हा गंभीर विषय बनला असताना, शासनाकडे पाठपुरावा करून ऑक्सिजनसाठी बीड जिल्हा स्वयंपूर्ण होईल अशी यंत्रणा उभारण्यात तत्कालीन जिल्हाधिकारी जगताप यांचा मोठा वाटा आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून अनेक त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज उभा करण्यासंदर्भातदेखील जगताप यांनी विविध उपाययोजना केल्या आहेत.
गुरुवारी नूतन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
नूतन जिल्हाधिकाऱ्यांपुढे आव्हान
कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचे मोठे आव्हान नवीन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्यापुढे असणार आहे. रुग्ण वाढले तर बेडची कमतरता न भासू देणे, ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा करणे, तसेच आरोग्य यंत्रणेतील सुविधा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान असणार आहे. तसेच जिल्ह्यातील विविध प्रश्न व त्यामधील राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपाला बळी न पडता सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्याचेदेखील आव्हान असणार आहे.
कारवाईची टांगती तलवार
प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली कामे वेळेत करण्यासाठी नवीन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे आग्रही असतात. तसेच कामात कुचराई करणाऱ्यांची गय ते करीत नसल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, ज्या कारणासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली त्या २०११ ते २०१९ या कालावधीतील कथित मनरेगा घोटाळा प्रकरणात अनेकांवर कारवाईची टांगती तलवार असणार आहे. त्यांमुळे अनेकांचे धाबे दणाणले असून, बचावासाठी वरिष्ठ नेत्यांकडे धाव घेत आहेत.
120821\12_2_bed_14_12082021_14.jpg
नवीन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांचे स्वागत करताना तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप