परळी ( बीड), दि. 16 : वैद्यनाथ महाविद्यालय समोरील मैदानात उघड्यावर राहत असलेल्या कुटूंबांना सोमवारी सकाळी सुखद धक्का बसला. संस्कार प्राथमिक शाळा व दिलसे फाऊंडेशनच्या वतीने दिवाळी सणानिमित्त या बेघरांना फराळ, नविन कपडे व दैनदिन वापराच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. नव्या विचाराने प्रेरित व्होऊन केलेल्या छोट्याशा प्रयत्नाने या उपेक्षितांची ख-या अर्थाने दिवाळी साजरी झाली व त्यांच्या चेह-यावर हसू उमटले.
परळी शहरातील डॉ. मौलाना आझाद चौकाच्या बाजूस मुख्य रस्त्या लगत एक दुर्लक्षीत वस्ती आहे. कचऱ्यातील भंगार गोळा करून उदरनिर्वाह करणारे हे लोक अनेक वर्षापासून या ठिकाणी उघड्यावर घाणीच्या साम्राज्यात राहतात. हि वस्ती प्राथमिक सुविधाही नसलेली हि वस्ती सणावारापासून तर कोसोदूर आहे. मनाला चटका लावणारी ही परिस्थिती निदान दिवाळी सणात तरी बदलू असा नवा विचार संस्कार प्राथमिक शाळा व दिलसे फाऊंडेशनकडून करण्यात आला.
यानुसार दिवाळीमध्ये प्रदुषण वाढवणा-या फटाक्यांवरील खर्च टाळून या दुर्लक्षीत वस्तीवरील महिला-पुरूषांना नविन कपडे, दैनदिन वापरच्या वस्तू व फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच लहान मुलांसाठी मिठाई देण्यात आली. यावेळी संस्कार शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व तसेच दिलसे फाऊंडेशनचे अध्यक्ष दिपक तांदळे, उपाध्यक्ष लखन भद्रे व सचिव सेवकराम जाधव, मुशीरखान पठाण, भाले, महादू शिंदे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.