लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : येथील नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक आठ बुधवारपासून पुन्हा कार्यान्वित केला आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे ६ मेपासून हा संच बंद होता. राज्यात विजेची मागणी वाढल्यास आणखी दोन संच सुरू होणार आहेत, अशी माहिती परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी दिली.
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आणि उद्योगधंदे बंद झाले. त्यामुळे मे महिन्यात राज्यात विजेची मागणी घटली. यामुळे नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेचे वीज निर्मिती संच क्रमांक सहा, सात, आठ हे तीन संच बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने घेतला होता.
आता महाराष्ट्र अनलॉक झाला असून राज्यातील उद्योगधंदे पूर्वपदावर येऊ लागले आहेत. त्यामुळे राज्यात विजेची मागणी वाढत असल्याने संच क्रमांक आठ हा बुधवारपासून चालू करण्यात आला आहे. या संचातून गुरुवारी सायंकाळी १७३ मेगावॅट वीज निर्मिती चालू होती. बंद संच क्रमांक सहा व सात हे आणखी दोन संच विजेची मागणी वाढल्यानंतर सुरू करण्यात येणार आहेत.
...
नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक आठ बुधवारपासून पुन्हा कार्यान्वित करण्यात आला आहे. संच क्रमांक सहा व सात हे विजेची मागणी वाढल्यानंतर कार्यान्वित होतील.
- मोहन आव्हाड, मुख्य अभियंता,
परळी औष्णिक विद्युत केंद्र.