बीड : केज नगरपंचायतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर चंदनचोरीचा गुन्हा नोंद झाला आहे. बालासाहेब दत्तात्रय जाधव असे गुन्हा नोंद झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने प्रजासत्ताक दिनी ही कारवाई केली.
अंबाजोगाईजवळील कारखाना परिसरातील देवराव भानुदास कुंडगर याच्या शेतात बालासाहेब दत्तात्रय जाधव (रा. केज) याने काही लोकांना एकत्र करत चंदनाची झाडे तोडून पोत्यात भरून ठेवली होती. याची माहिती मिळाल्यावरून पंकज कुमावत यांच्या पथकातील केजचे सहायक निरीक्षक संतोष मिसळे यांच्यासह सहकाऱ्यांनी २६ जानेवारी रोजी छापा टाकाला.
यावेळी पोलिसांना २७ किलो चंदनाचा गाभा आढळून आला. छाप्यात देवराव कुंडगर यास ताब्यात घेतले. त्याने सदरचे चंदन बालासाहेब जाधव याचे असल्याचे सांगितले. संतोष मिसळे यांच्या फिर्यादीवरून बालासाहेब जाधव, देवराव कुंडगर व लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील एक अशा तिघांवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. कारवाईत हवालदार बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, राजू वंजारे, रामहरी भंडारे, सचिन अहंकारे यांनी सहभाग घेतला.