बीड : तालुक्यातील कपिलधार येथे बालविवाह होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी त्या दिशेने धाव घेतली. मात्र, ही बातमी फुटली आणि संबंधितांपर्यंत पोहोचली. त्यामुळे पोलीस अन् सामाजिक कार्यकर्ते पोहोचण्याआधीच वऱ्हाडींसह नवरदेव-नवरी पसार झाले. रविवारी दुपारी २ वाजता हा प्रकार घडला.
बीड तालुक्यातीलच एका गावातील १७ वर्षीय मुलीचा विवाह नगर जिल्ह्यातील ३२ वर्षीय मुलासोबत लावला जात होता. कपिलधार देवस्थान येथे सर्व नियोजनही झाले होते. १२ वाजेच्या सुमारास ही माहिती बेटी बचाओ, बेटी पढाओ सदस्य तत्वशील कांबळे, अशोक तांगडे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पोलीस, महसूल प्रशासनाला माहिती दिली. २ वाजेच्या सुमारास हे सर्व पोहोचणार होते. १२ वाजेपासून सर्वच तयारी सुरू होती. २ वाजता पोहोचण्याआधीच ही बातमी फुटली. प्रशासन कपिलधारमध्ये पोहचण्याआधीच नवरदेव-नवरी आणि सर्व वऱ्हाडी तेथून निघून गेले.
दरम्यान, या दोन्ही कुटुंबियांची सोमवारी घरी जाऊन भेट घेतली जाणार आहे. त्यांनी विवाह केला असेल तर कारवाई आणि नसेल केला तर त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. त्यांना मुलीबद्दल काही अडचण असेल तर त्यावर बेटी बचाओ, बेटी पढाओ अंतर्गत मदत केली जाणार असल्याचे सदस्य तत्वशील कांबळे यांनी सांगितले. त्यांच्यासोबत तलाठी शेळके आणि बीड ग्रामीणचे पोलीस कर्मचारी म्हेत्रे हे सुद्धा होते.