फॉलोअप
बीड : जिल्हा रुग्णालयातील प्रकल्प प्रेरणा विभागातील १४ लाख रुपयांच्या घोटाळ्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुदाम मोगले यांच्यासोबत आता राष्ट्रीय आरोग्य अभियानचाही ‘वाटा’ असल्याचे उघड झाले आहे. प्रकल्प प्रेरणा विभागाने वापरलेली जुनी जीप ही इतरांची कोणाची नसून खुद्द लेखापाल संताेष चक्रे यांच्या नावावर असल्याचा पुरावा हाती लागला आहे. या घाेटाळ्यात दिवसेंदिवस संशयितांची साखळी वाढत आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना भेटी देण्यासाठी प्रकल्प प्रेरणा विभागाने एमएच १३ एसी २१८३ ही १४ वर्षे २ महिने वय असलेली जुनी जीप वापरली होती. परंतु याचे सर्व बिल हे एमएच २३ एडी ६३०० या अनोळखी वाहन क्रमांकावर काढले होते. या बिलावर प्रकल्प प्रेरणाचे नोडल ऑफिसर डॉ. सुदाम मोगले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. विशेष म्हणजे ६३०० हे वाहन महेश जाधव या खासगी व्यक्तीचे असून त्यांना याबाबत काहीच कल्पना नव्हती. हा सर्व प्रकार ‘लोकमत’ने तीन दिवस सर्च ऑपरेशन करून चव्हाट्यावर आणला. त्यानंतर सर्वांचेच धाबे दणाणले.
दरम्यान, वापरलेल्या वाहनाची माहिती घेतली असता ती जीप एनएचएममधील लेखापाल संतोष चक्रे यांच्या नावावर आहे. तसेच सर्व बिले देखील त्यांनीच काढले आहेत. यात डीपीएमसह कंत्राटदारांचाही वाटा असून सर्वांनी मिळून ही ‘शाळा’ केल्याचे दिसत आहे. आता याप्रकरणात आणखी किती लोकांचा सहभाग आहे, हे चौकशीनंतरच समोर येणार आहे.
--
४२० चा गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली
या प्रकरणात डॉ. मोगले यांनी शासनाची तर कंत्राटदार व जुनी जीप असलेल्या लेखापालाने चुकीचा वाहन क्रमांक देऊन खासगी वाहनधारकाची फसवणूक केली आहे. यात दोन वेगवेगळे ४२० चे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. सर्व बिले डॉ. मोगले यांच्या स्वाक्षरीने काढली असून एनएचएममधील ‘अनुभवी’ कर्मचाऱ्यांचाही यात सहभाग असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांचेही सहआरोपी म्हणून नाव येण्याची शक्यता आहे.
--
रविवार व सोमवारी सुट्टी असल्याने पत्र काढले नाही. यात सक्षम समिती नियुक्त करून चौकशी करण्यात येईल. आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाहीत.
डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड