बीड : कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे कौतूक केले. तसेच उपचार, सुविधा, कागदपत्रांची मांडणी याबद्दल समाधान व्यक्त केले. तर आयटीआयमधील कोवीड केअर सेंटरमधील अस्वच्छतेबद्दल नाराजी व्यक्त केली. पथकाने पहिल्याच दिवशी आरोग्य विभागाबद्दल काम छान असल्याची प्रतिक्रिया दिली असली तरी काही त्रुटी आहेत, त्या सुधारण्याच्या सूचनाही केल्या.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने डॉ.रक्षा कुंदल व डॉ.अरविंदसिंह कुशवाह यांचे पथक गुरुवारी बीड जिल्हा दौऱ्यावर पाठविले. डॉ.कुंदल या बुधवारी रात्रीच बीडमध्ये दाखल झाल्या. सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागाकडून आढावा घेत त्यांनी जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली. सर्वात आगोदर ऑक्सिजन निर्मित करणाऱ्या प्लांटची पाहणी केली. तेथून त्या कोरोना वॉर्डमध्ये गेल्या. सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभारही होते. आयसीयू कक्षासह इतर दोन वॉर्डची त्यांनी पाहणी केली. रुग्णांवर केले जात असलेले उपचार, त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा याबाबत माहिती घेतली. तसेच दिलेल्या उपचाराची कशी माहिती अद्यावत आहे का? याचीही तपासणी केली. नंतर त्यांनी बाहेर येत कोरोना चाचणी केंद्राला भेट दिली. येथील तंत्रज्ञांशी संवाद साधला. पुढे त्या कोरोना लसीकरण केंद्राच्या ठिकाणी गेल्या. नोंदणी, लस देण्याचे ठिकाण आणि निरीक्षण कक्षाची पाहणी केली. नंतर रुग्णालयातील प्रयोगशाळाची माहिती घेतली. येथे त्यांनी माध्यमांशी बोलताना जिल्हा रुग्णालयातील कामाचे कौतूक केले.
पथकाच्या दिमतीला फौजफाटा
जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, डॉ.ए.आर.हुबेकर, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, तहसीलदार शिरीष वमने, राज्य उत्पादन शुल्कचे नितीन धार्मिक, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट, डॉ.सचिन आंधळकर, डॉ.जयरी बांगर, डॉ.बाबासाहेब ढाकणे, डॉ.महेश माने, डॉ.अमित बायस, मेट्रन संगिता दिंडकर, विजया शेळके, प्रतिभा शिंगाडे आदींचा फौजफाटा पथकाच्या दिमतीला होता.
परिचारीकांच्या कामाचे तोंडभरुन कौतूक
कोरोना वॉर्डचा राऊंड घेताना त्यांना परिचारीकांनी ठेवलेले रेकॉर्ड आणि वेगवेगळ्या केलेल्या फाईल्स आणि नियोजन आवडले. जाताना पथकाच्या डॉ. रक्षा कुंदल यांनी मेट्रन संगिता दिंडकर यांच्याशी संवाद साधत परिचारीकांच्या कामाचे कौतूक केले. जाताना त्यांनी सर्वांसोबत फोटो काढून शुभेच्छाही दिल्या. अपुऱ्या मनुष्यबळ असतानाही दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल त्यांनी स्वागत केले.
आयटीआयमध्ये अस्वच्छता
आयटीआयमधील कोवीड केअर सेंटरला दुपारी ३ वाजता पथकाने भेट दिली. दुपारनंतर डॉ.अरविंदसिंग कुशवाह हे देखील डॉ.कुंदल यांना सोबत आले. दोघांनीही सीसीसीची पाहणी केली. प्रत्येक वॉर्डमध्ये जावून रुग्णांशी संवाद साधण्यासह पाहणी केली. यावेळी अस्वच्छतेबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच येथे ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्याच्या सुचनाही केली. डॉ.अमित बायस व डॉ.मोनिका तागड यांनी त्यांना माहिती दिली.
संजीवणीमधील कागदपत्रांची तपासणी
खाजगी कोवीड सेंटर असलेल्या संजीवणी हॉस्पिटलमध्ये पथकाने भेट दिली. आयसीयू कक्षात जावून त्यांनी रुग्णांवर उपचार केल्या जात असलेल्या कागदपत्रांची तपासणी केली. तसेच फिजिशियन आणि इतर स्टाफ सोबत चर्चाही केली. जवळपास अर्धा तास हे पथक आयसीयूमध्ये होते. नंतर कक्षाची पाहणी करुन पथक परत निघाले. जाताना त्यांनी हॉस्पिटलचा सत्कारही नाकारला. येथून थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत पुन्हा बैठक घेतल्याचे सांगण्यात आले.
आणखी चार दिवस पथक जिल्ह्यातच
केंद्रीय पथक पाच दिवस जिल्ह्यात राहून आढावा घेणार आहे. पहिला दिवस सुखाचा गेला असला तरी आणखी चार दिवस हे पथक जिल्ह्यातच तळ ठोकून राहणार आहे. प्रशासन आणि आरोग्य विभागाला कसलीही माहिती न देता ते अचानक कोवीड केअर सेंटर, कंटेनमेंट झोन, रुग्णालये आदी ठिकाणी भेटी देणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
===Photopath===
080421\082_bed_13_08042021_14.jpg~080421\082_bed_12_08042021_14.jpeg
===Caption===
खाजगी कोवीड सेंटरमधील कागपत्रांची तपासणी करताना पथकाचे डॉ.अरविंदसिंग कुशवाह~जिल्हा रूग्णालयातील परिचारीकांच्या कामाचे कौतूक पथकाच्या डॉ.रक्षा कुंदल यांनी केले. जाताना त्यांनी मेट्रन संगिता दिंडकर यांच्यासह टिमचे स्वागत केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते, डाॅ.सूखदेव राठोड, डॉ.जयरी बांगर, विजया शेळके, प्रतिभा शिंगाडे, स्वाती गव्हाणे, नवनाथ सोनटक्के आदी.