बीड : शहरात सध्या सर्वत्र मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी सामान्य नागरिकांना वावरणेही कठीण झाले आहे. असे असतानाही पालिकेकडून काहीच उपाययोजना केल्या जात नसल्याचे समोर आले आहे. या कुत्र्यांमुळे महिला, मुलींसह लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पालिकेकडून त्यांची नसबंदी अथवा बंदोबस्त केला जात नसल्यानेच त्रास सहन करावा लागत आहे.
शहरात दिवसा आणि रात्रीच्या सुमारास सर्रासपणे चौकाचौकांत मोकाट कुत्रे दिसतात. झुंडीच्या झुंडी रस्त्यावर उभा राहात असल्याने पुढे जाणेही धोक्याचे ठरते. महिला, मुली तर रस्ता वळून जातात. याच मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी ही पालिकेची असते. परंतु बीड पालिका याबाबत अनभिज्ञ आहे. त्यांच्याकडून बंदोबस्तासाठी उपाययोजनाच केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सामान्यांच्या मनात भीती आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जाेर धरू लागली आहे.
--
या चौकांत थोडं सांभाळूनच
शहरातील बलभीम चौक, माळीवेस चौक, सहयोगनगर, मोंढा रोड, पाण्याची टाकी परिसर, भक्ती कन्स्ट्रक्शन रोड, तुळजाई चौक, नाट्यगृह चौक, केएसके कॉलेज रोड, पेठबीड भागातील विविध चौकात रात्रीच्या सुमारास कुत्र्यांच्या झुंडी दिसून येतात.
--
कुत्र्यांच्या नसबंदीसाठी मिळेना कंत्राटदार
बीड पालिकेने कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी पाच लाख रुपयांची विशेष तरतूद केलेली आहे. याबाबत टेंडरही काढले. परंतु टेंडर कोणीच न भरल्याने हे कंत्राट तसेच राहिले. हा निधीही पडून राहिल्याचे समजते.
---
चोरांची नाही, कुत्र्यांची भीती वाटते
मी एका दुकानात कामाला आहे. सर्व काम आटोपून घरी जायला ११ वाजतात. माझ्याकडे दुचाकी आहे, परंतु नाट्यगृह रोड परिसरात कुत्र्यांची झुंड समोर दिसते. ती अंगावर येण्याची खूप भीती वाटते. जेवढी भीती चोरांची वाटत नाही, त्यापेक्षा जास्त या कुत्र्यांची वाटते.
मनोज शिंदे, बीड
--
कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी ५ लाख रुपये निधीची तरतूद केलेली आहे. टेंडरही काढले, पण कोणीच भरले नाही. असे असले तरी बंदोबस्तासाठी कर्मचाऱ्यांना सूचना केल्या जातात.
डॉ. उत्कर्ष गुट्टे, मुख्याधिकारी, नगरपरिषद, बीड
130921\13_2_bed_9_13092021_14.jpeg
बीड शहरातील धोंडीपुरा भागात कुत्र्यांच्या अशाप्रकारे झुंडी दिसतात.