- नितीन कांबळेकडा- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून आष्टी तालुक्यातील घाटा पिंपरीचे रहिवासी निलेश अर्जून गुंड यांची शिक्षणाधिकारी पदी निवड झाली आहे. पाच वर्षांत एसटीआय, सहाय्यक प्रकल्प अधिकारी ते शिक्षणाधिकारी असा प्रेरणादायी प्रवास निलेश यांनी केला आहे. अधिकारी पदाची हॅट्रिक साध्य केल्याने गावकऱ्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी अर्जुन गुंड यांचे निलेश चिरंजीव आहेत. निलेश यांचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण नवोदय विद्यालय गढी येथे झाले. पुढे त्यांनी पुणे येथून अभियंत्याची पदवी घेतली. याच काळात स्पर्धा परीक्षेची तयारी करत २०१७ साली त्यांची एसटीआय पदावर निवड झाली. तर २०२० च्या राज्य सेवेतून त्यांची सहायक प्रकल्प अधिकारी (आदिवासी विकास विभाग) पदी निवड झाली. सध्या सहायक प्रकल्प अधिकारी म्हणून आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे येथे ते कार्यरत आहेत.
दरम्यान, २०२२ सालच्या राज्य सेवेतून त्यांची शिक्षणाधिकारी पदावर निवड झाली आहे. त्यांच्या यशाची वार्ता समजताच ग्रामस्थांनी गावात फटाके फोडून आनंद साजरा केला. यावेळी मोहन जगताप, भागचंद झांजे, जयश्री जगताप, डॉ मेघा जगताप, डॉ. सुखदा जगताप,डॉ. संपदा जगताप, उद्योजक नागेश मुळीक, गोवर्धन तळेकर, मच्छिंद्र मुळीक, प्रकाश गुंड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.