केज (बीड): सोशल मीडियात सन 2020 मध्ये आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी खासदार निलेश राणे यांनी आज केज न्यायालयात हजर लावली. यावेळी न्यायाधीश एस.व्ही. पावसकर यांनी त्यांना जामीन मंजूर केला.
सन 2020 मध्ये केज तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब मस्के यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती की, वंचित बहजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध माजी खासदार निलेश राणे, केज तालुक्यातील विवेक अंबाड ( रा.लाडेगाव ) आणि रोहन चव्हाण ( रा. पळसखेडा) यांनी अपशब्द वापरून दोन समाजामध्ये शत्रुत्व, व्देषभाव व तेढ निर्माण होईल अशा पोस्ट सोशल मिडियावर शेअर केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी. या प्रकरणी केज पोलीस स्टेशनला माजी खासदार निलेश राणे, विवेक अंबाड, आणि विवेक चव्हाण यांच्या विरुद्ध ऑक्टोबर 2020 रोजी गु.र.नं. 432/2020 भा.दं.वि. 505 (2) आणि 34 नुसार गुन्हा दाखल झाला होता.
तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी या प्रकारणाचा तपास करून केज न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. दरम्यान, हे प्रकरण सुनावणीसाठी आल्यानंतर आज दि. 29 मार्च रोजी निलेश राणे हे न्यायाधीश एस. व्ही. पावसकर यांच्या न्यायालयात हजर झाले. पुढील तारखेस हजर राहण्याच्या अटीवर व 20 हजार रुपयांच्या जाचमुचलक्यावर न्यायालयाने त्यांना जामिन मंजूर केला. यावेळी फिर्यादीच्या वतीने अॅड. सतीश मस्के यांनी तर निलेश राणे यांच्या वतीने अॅड. तपसे यांनी न्यायालयात बाजू मांडली.