लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : बांधकाम क्षेत्रातील फिरलेली रक्कम १० हजार रूपयाची देत नसल्यामुळे नऊ जणांनी प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी गुरूवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यात परळीतील नऊ जणांना सात वर्षाची कारावासाची शिक्षा तसेच दहा हजार रूपयांचा दंड अतिरिक्त सत्र न्यायाधिक क्र .१ चे न्या.अनिल सुब्रमण्यम यांनी सुनावला.परळीतील बाबासाहेब गायकवाड व जावेदखान पठाण या दोघांची मैत्री होती. या दोघांनी औष्णिक विद्युत केंद्रात बांधकामाची कंत्राटी घेण्याची कामे चालत होती. कंत्राटी कामातील बाबासाहेब गायकवाड यांच्याकडे १० हजार रूपये हिशोबातील फिरले होते. सदरील रक्कम जावेदखाँ पठाण वारंवार मागणी करत होते. मात्र सदरील रक्कम वसूल होत नसल्यामुळे १८ जून २०१७ रोजी परळी शहरातील एन.के. शोरूममध्ये जावेदखा पठाण यांनी बाबासाहेब गायकवाड यांना बोलावून पैशाची मागणी केली. या मध्ये त्यांची बाचाबाची झाली. तेथून आरोपी निघून जात इतर गैरकायद्याची मंडळी जमवून जावेदखाँ पठाण, सय्यद सारेख समद, शेख जुबेर शेख शब्बीर, शेख निजाम शेख बाबू, समद अमजद सिद्दिकी, सय्यद तौफिक सय्यद खुरखान, मुजहीर इस्माईल खान पठाण, आयाज शहराज खान, बबलू उर्स समर लतीब खा पठाण यांनी तलवार व काठ्याने फिर्यादी बाबासाहेब गायकवाड यांच्या डोक्यात व हातावर वार केले. सदरील हल्ल्यात बाबासाहेब गायकवाड यांना परळीच्या ग्रामीण रूग्णालयात नेले. परंतु गंभीर दुखापत झाल्यामुळे स्वाराती रूग्णालयात दाखल केले. नंतर गायकवाड यांना स्वाराती रूग्णालयाने देखील लातूरच्या खासगी रूग्णालयात हालविण्याच्या सूचना दिल्या. लातूर येथे शस्त्रक्रिया करून त्यांचा जीव वाचविण्यात यश आले होते. या प्रकरणी बाबासाहेब गायकवाड यांच्या फिर्यादीवरून परळी शहर ठाण्यात नऊ जणांविरूद्ध खुनी हल्ला, अनुसूची जाती-जमाती कायदा व गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक स्वाती भोर यांनी तपास करून दोषारोप पत्र अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने ११ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी पक्षाची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने वरील सर्व आरोपींना खुनी हल्ला प्रकरणी सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व पाच हजार रूपयांचा दंड व दंड न भल्यास सहा महिने सक्त मजुरी तर कलम १४८ अन्वये दोन वर्ष शिक्षा व पाचशे रूपयांचा दंड न भरल्यास एक महिना सक्त मजुरीची शिक्षा अतिरिक्त सत्र न्या. अनिल सुब्रमण्यम यांनी ठोठावली. सर्व शिक्षा एकत्रित भोगवण्याच्या असून अनुसूचित जाती व जमाती कायद्यामधून वरील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकारतर्फे अॅड.अशोक कुलकर्णी यांनी काम पाहिले तर आरोपीच्या शिक्षेबद्दल सहा. सरकार आर.एम.ढेले यांनी युक्तीवाद केला. सरकार पक्षास अॅड. डी.व्ही. चौधरी, अॅड. डी.आर.गोरे यांनी सहकार्य केले.सरकार पक्षातर्फे तपासले ११ साक्षीदारया प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयात ११ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी पक्षाची साक्ष ग्राह्य धरुन न्यायालयाने वरील सर्व आरोपींना हल्लाप्रकरणी सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नऊ जणांना सात वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:26 AM