बीड : कोराेना संसर्गामुळे चालू शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागासह शाळा व्यवस्थापनाला कसरत करावी लागली आहे. २३ नोव्हेंबरपासून इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू झाले. आता २७ जानेवारीपासून पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून जिल्ह्यात शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते सातवीच्या वर्गांना शिकविणाऱ्या ९०४३ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येणार असून आरटीपीसीआर चाचणीबाबत शिक्षण विभागाने शाळांना निर्देश दिले आहेत. इयत्ता ९ वी ते १२ वी वर्ग सुरू करण्याआधी या वर्गांसाठी अध्यापन करणाऱ्या सहा हजार ६०० शिक्षक तसेच ३०७२ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. आता इयत्ता पाचवी ते सातवीच्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांची चाचणी करण्यात येणार आहे. पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने शाळांसाठी मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. आठवडाभरात ९०४३ शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणे शक्य होणार नसून ही प्रक्रिया वेळेत न झाल्यास शाळांची घंटा लांबणीवर पडू शकते. मात्र, शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यातील पाचवी ते आठवी वर्गांपर्यंत शाळा सुरू करण्यात येत आहेत.
----------
कोरोना टेस्ट करण्याची तयारी काय?
शिक्षकांच्या कोरोना चाचणीचा अहवाल मुख्याध्यापकांनी प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करावयाचा आहे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मदतीने कोविड टेस्टसंदर्भात सविस्तर वेळापत्रक तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. तपासणी केंद्रांची क्षमता लक्षात घेऊन नियोजन करून कोणत्या तपासणी केंद्रात कोणत्या शाळेच्या कोणत्या शिक्षकांनी कधी उपस्थित राहावे, याचे नियोजन शिक्षकांपर्यंत कळविण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
----
चाचणी बंधनकारक
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड-१९ संदर्भातील आरटीपीसीआर चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. तपासणी केंद्रात एकाच वेळी गर्दी होणार नाही आणि तपासणी ही जास्तीतजास्त होतील, या दृष्टीने मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनानुसार शासनाच्या सूचनांची अंमलबजावणी सुरू करत आहोत. - श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी, प्राथमिक
------------
जिल्ह्यातील पाचवी ते आठवी वर्गांच्या शाळांची संख्या १९९४
जिल्ह्यातील विद्यार्थीसंख्या २,०५,५३६
जिल्ह्यातील शिक्षकसंख्या ९०४३
-----------